एव्हरेस्ट बेस कॅम्पवर केली चढाई; ध्रुवची दमदार कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ट्रेकिंग करणे अतिशय कठीण काम आहे. त्यासाठी खूप शारीरिक फिटनेस, पूर्वतयारी आणि मानसिक कणखरपणाही लागतो, तेव्हा कुठे ट्रेकिंगचा मोठा अनुभव असलेले ट्रेकर्स एव्हरेस्ट बेस कॅम्प या 5364 मीटर इतक्या अधिक उंचीवर पोहचू शकतात. इथे येताना विरळ झालेल्या हवामानामधून अतिशय खडतर वाट चढून यावी लागते. प्रसंगी उणे तापमानाचा सामना करावा लागतो. अडथळ्यांची ही शर्यत पार करत नवी मुंबईच्या अवघ्या दहा वर्षीय ध्रुव विजेंद्र काटियार या विद्यार्थ्याने एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केले आहे.

ध्रुव हा नेरुळमधील रायन इंटरनॅशनल स्कूलचा सहावीतला विद्यार्थी आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहचलेल्या इतक्या कमी वयाच्या मुलांमध्ये त्याचा समावेश झाला आहे. एव्हरेस्ट कॅम्पचा ट्रेक हा हिमालयामधील एक खडतर दर्जाचा ट्रेक समजला जातो. या मोहिमेसाठी त्याने नेपाळमधील लुकला येथून चढाई सुरू केली. तो काठमांडूवरून विमानाने लुकलाला पोहचला व शेर्पा गाईडसह त्याने पुढे कूच केले. पुढे त्याने लोब्युचेते गोरक्षेप चढाई सुरू केली व त्याच दिवशी खुंबू हिमनदीच्या (ग्लेशियर) परिसरात असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचला. एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत जाणे हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न ध्रुवने प्रत्यक्षात उतरवले आहे.

 कोणत्याही प्रशिक्षण, आर्थिक मदतीशिवाय गाठले ध्येय     

सामान्यतः अशा मोहिमांना शाळा किंवा अन्य संस्थांचे आर्थिक पाठबळ लाभते, परंतु या मोहिमेचा संपूर्ण खर्च ध्रुवच्या पालकांनी केला. विशेष म्हणजे ध्रुवला याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षणही मिळाले नव्हते किंवा त्याला कोणतीही आर्थिक मदत मिळाली नव्हती. त्याच्या कुटुंबामध्येही खेळ किंवा साहसाची पार्श्वभूमी नव्हती. त्याचे वडील विजेंद्र काटियार एका एमएनसीमध्ये सायबर स्पेस विषयामध्ये कंट्री मॅनेजर आहेत तर आई स्वतःचे स्टार्टअप चालवते. ध्रुवचे यश हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या यशामुळे ध्रुवने देशातील गिर्यारोहणाच्या क्षेत्रात ध्रुव ताऱ्यासारखे अढळ स्थान निर्माण केले आहे, असेच म्हणावे लागेल.