धुळे महापालिका निवडणूक; कौल कुणाला? आज निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, धुळे

महापालिकेच्या 73 जागांसाठी उमेदवारी करणाऱया 354 उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले. आरोप-प्रत्यारोप, वाहनांवर दगडफेक आणि पैसेवाटपाच्या चर्चा यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले. रविवारी सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर मतदारांचा थंडा प्रतिसाद पाहायला मिळाला. अधिकारी मतदारांची वाट पाहत होते. दुपारी 12 पर्यंत शहरातील सर्वच केंद्रांवर मतदारांनी थंड प्रतिसाद दिला.

नगरमध्ये भाजपला शिवसेनेची टक्कर, तर धुळ्यात भाजप मोठा पक्ष

अकरापर्यंत मतदानाची टक्केवारी जेमतेम दहा टक्क्यांच्या आसपास होती. मुस्लिमबहुल क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मात्र सकाळी महिलांची गर्दी होती. दुपारी 3 नंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. निवडणूक यंत्रणा राबविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंदाजानुसार मतदान सरासरी साठ टक्क्यांच्या आसपास झाले. उद्या 10 डिसेंबरला शासकीय गोदामात सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

मतदारांना पैसे वाटताना अटक
महापालिका निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्ष आणि प्रबळ उमेदवारांकडून मतदारांना आर्थिक प्रलोभनांची भुरळ पाडण्यात आली. शहरातील शासकीय दूध डेअरीजवळ असलेल्या समता नगरमध्ये मतदारांना पैसे देत असलेल्या विनोद अग्रवाल या व्यक्तीला पकडण्यात आले. त्याच्याकडे मतदार यादी आणि 49 हजार रुपये आढळले.