
सामना प्रतिनिधी । धुळे
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात शिवसेनेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी साडेसात ते दहा या काळात मोठय़ा प्रमाणात कचऱयाचे ढीग जमा करण्यात आले.
शिवसेनेतर्फे शनिवारी रुग्णालयाच्या आवारात महास्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी साडेसातपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेला महापालिका आणि रुग्णालय प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. महापालिकेच्या आरोग्य विभागातील दीडशे कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. याशिवाय रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱयांनीदेखील सहभाग नोंदविला. शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. शिवसेनेच्या नगरसेविका ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांनी जेसीबी यंत्र देऊ केले तर माजी आमदार शरद पाटील यांनी ट्रॅक्टर ट्रॉल उपलब्ध करून दिली. इमारतीच्या परिसरातून सुमारे 50 ट्रक्टर ट्रॉलीज काडीकचरा आणि मातीचे ढीग काढण्यात आले. त्यानंतर हा सर्व कचरा ट्रक्टरच्या ट्रॉलीत भरून शहराबाहेर काढण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक माणिक सांगणे, निवासी वैद्यकीय अधिकारी संजय शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, डॉ.सुशील महाजन, माजी जिल्हा प्रमुख भूपेंद्र लहामगे, अतुल सोनवणे, महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी, पंचायत समितीचे माजी सभापती कैलास पाटील, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे यांच्यासह बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.
स्वच्छता मोहिमेचा समारोप होत असताना निवासी वैद्यकीय अधिकारी संजय शिंदे यांनी उपस्थित कर्मचाऱयांना व्यसनमुक्तीची शपथ देवविली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक एस. बी. सांगळे, माजी आमदार शरद पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अवघ्या तीन तासांत रुग्णालयाच्या आवारातील उद्यान आणि इतर भागांतील कचरा गोळा करण्यात आला. रुग्णालयाच्या आवारातील स्वच्छतेची जाबाबदारी शिवसेना घेत आहे.
































































