
सामना प्रतिनिधी । मुंबई
27 कोटींचे हिरे हडप केल्यावर पोलिसांना गुंगारा देण्याकरिता राजस्थान व त्यानंतर इलाहाबादला कुंभमेळ्यात साधू बनून बसलेल्या हिरे दलालाच्या अखेर बी.के.सी. पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यतीश फिचडिया असे त्याचे नाव आहे. फसवणुकीच्या गुह्यात पोलिसांनी केतन परमार, इम्रान खान, सुरेश मजेशिया, विशाल श्रीवास्तव, कामील कुरेशीला अटक केली. पोलिसांनी 20 कोटींचे हिरे आणि 38 लाख रुपये जप्त केले आहेत.
बी.के.सी.च्या भारत डायमंड बोर्समध्ये यतीश हा हिरे दलालीचे काम करायचा. त्याच्यावर अनेक हिरे विक्रेत्यांचा विश्वास होता. याचाच फायदा घेत त्याने इतर साथीदारांना सामील करून घेतले. डिसेंबर महिन्यात परेशने व्यापाऱयांकडून हिरे घेतले. 27 कोटींचे हिरे घेतल्यावर तो पळून गेला. हिरे हडपण्याकरता त्याने एकाची कायदेशीर मदत घेतली. पत्नीला सांगून त्याने बेपत्ता झाल्याची तक्रार विरार पोलीस ठाण्यात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर यतीश हा अजमेर, राजस्थान, दिल्ली, चंदिगड, सिमला, हैदराबाद येथे गेला. त्याने प्रत्येक ठिकाणी वेशभूषा बदलली. पोलीस आपल्यापर्यंत पोहचू नयेत याची त्याने खबरदारी घेतली.
गुजरातच्या हिरे व्यापाऱयांना सावध केले
पोलिसांनी मुंबई आणि गुजरातमधील सर्व हिरे व्यापाऱयांना अगोदरच सावध केले होते. त्यामुळे यतीशला हिरे विक्रीत अडचणी येत होत्या. पोलिसांनी आतापर्यंत 18 हिरे व्यापाऱयाकडील हिरे हस्तगत केले आहेत. उर्वरित सहा कोटींचे हिरे हस्तगत करणे बाकी आहे. अप्पर पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 8 चे उपयुक्त अनिल कुंभारे, सहायक आयुक्त दिनेश जोशी, वरिष्ठ निरीक्षक कल्पना गाडेकर, पोलीस निरीक्षक प्रदीप खानविलकर, सहायक निरीक्षक सतीश बोराटे, उप निरीक्षक गणेश तोडकर, अमित उतेकर, पोलीस हवालवार नाईक, पाटील, यांच्या पथकाने हि कामगिरी केली.
काही दिवस कुंभमेळय़ात राहिला
पोलिसांना गुंगारा देण्याकरिता तो प्रयागराज येथे गेला. तेथील कुंभमेळय़ात तो काही दिवस साधू बनून राहिला. यतीश हा कुंभमेळ्यात असल्याची माहिती बी.के.सी. पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली. पोलिसांचे पथक तेथे गेले. मात्र तो तेथून पळून गेला होता. वेगवेगळ्या शहरांत वेशभूषा बदलून राहिल्याने त्याच्याकडील पैसे संपले होते. त्याने राजला पैसे घेऊन कल्याण येथे बोलावले. ही माहिती मिळताच पोलीस तेथे गेले. तेथून यतीश आणि राज मन्सुरीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलीस तांत्रिक माहितीद्वारे आपल्यापर्यंत पोहचू नयेत म्हणून त्याने बोगस कागदपत्रांद्वारे सीम कार्ड विकत घेतले होते. त्यावरून तो सहकाऱयांच्या संपर्कात असायचा. तर फसवणुकीतील हिऱयांची विक्री होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती.




























































