दूषित पाण्याने शहापुरात अतिसाराची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शहापूर

हातगाडीवरील चायनीज खाल्ल्याने २० जणांना खर्डीमध्ये विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच शहापूर तालुक्यातील तुते या गावात बोअरवेलच्या दूषित पाण्यामुळे २५ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. या सर्वांना शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून दूषित पाण्यामुळे शेकडो ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय पथक तातडीने दाखल झाले असून पाण्याचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

शहापूर तालुक्यात मुबलक पाऊस पडला तरीही वाडय़ा-वस्त्यांवर अद्यापि पाण्याची टंचाई जाणवते. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे येथे असली तरी आदिवासींना मात्र दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्याचा फटका शहापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तुते गावातील ग्रामस्थांना बसला. या गावाची लोकसंख्या ३५० एवढी असून एकूण चार सरकारी बोअरवेल आहेत. त्यातील एका बोअरवेलमधून दूषित पाणी येत होते. ते प्यायल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. बोअरवेलची दुरुस्ती वेळेवर न केल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचे पाणी प्यायल्याने गेल्या दोन दिवसांपासून ग्रामस्थांना उलटी, अतिसाराची लागण झाली आहे.