डिजिटल निमंत्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता वारणकर

तंत्रज्ञान हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. हेच आधुनिक तंत्रज्ञान विवाहाच्या निमंत्रणपत्रिकेतही शिरले आहे.

आपली लग्नपत्रिका इतरांपेक्षा वेगळी असावी, असं प्रत्येकालाच वाटत असतं… लग्न ठरल्यानंतर कशा प्रकारची पत्रिका छापायची? यावर चर्चा सुरू होते. त्यासाठी अनेक दुकानं फिरून तऱहेतऱहेचा मजकूर असलेल्या, सुगंधी तसेच ऑफ व्हाइट, गोल्ड, मरून अशा रंगीबेरंगी कागदांच्या पत्रिकांची निवड केली जाते. यासाठी आपण बरेच पैसेही मोजतो शेवटी लग्न झाल्यानंतर या पत्रिका पडून राहतात. काही वेळा तर कचराकुंडीतही जातात. विवाह झालेल्या जोडप्याव्यतिरिक्त फारच कमी जणं त्या जपून ठेवतात मात्र आता याला ‘डिजिटल लग्नपत्रिका’ हा आधुनिक पर्याय उपलब्ध झाला आहे, ज्याद्वारे ‘लग्नसोहळा’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातला हळवा क्षण जपला जाईल.

डिजिटल पत्रिकेची संकल्पना शोधून काढली आहे प्रतीक ढोले या तरुणाने. आजच्या तंत्रज्ञानाची ताकद ओळखून अशा पद्धतीची वेगळी लग्नपत्रिका आपण तयार करू शकतो हे लक्षात आले, असे यांत्रिकी अभियंता असलेला आणि अभियांत्रिकीचे शिक्षण लंडनमधील कॉन्व्हेण्टरी विद्यापीठातून घेतलेला प्रतीक सांगतो. स्वतःच्या लग्नापासूनच त्याने त्याच्या या नव्या योजनेला सुरुवात केली.

सर्वसामान्य माणूस एका चांगल्या पत्रिकेची किंमत 25 रुपयांपेक्षा जास्तही मोजतो. प्रतीकने लावलेल्या नव्या डिजिटल लग्नपत्रिकेचा एकूण खर्च 20 ते 25 हजार रुपये आहे. या खर्चात लग्नाच्या आमंत्रणासह संपूर्ण वेबसाइट तयार करून दिली जाते. यामध्ये लग्नापूर्वीची, लग्नाची छायाचित्रे, लग्नाच्या प्रत्येक विधींची छायाचित्रे शिवाय प्रत्यक्ष लग्नसोहळाही पाहता येईल. महत्त्वाचे म्हणजे लग्नाच्या आठवणींचा आनंद कायमस्वरूपी घेता यावा यासाठी नवीन पिढी अशा पद्धतीची पत्रिका तयार करून घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते. काहीजण तंत्रज्ञानाचा कमी वापर करतात. मोबाईल समजत नाही. इंटरनेट वापरत नाहीत, अशांनाही या पत्रिकेचं अप्रुप आहे.

लोकांकडून या संकल्पनेला मिळणाऱया प्रतिसादाविषयी प्रतीक यांचं म्हणणं आहे की, आम्ही प्रतिसादाची अपेक्षा केली नव्हती फक्त संकल्पना स्वतःपासून सुरू केली. सुरुवातीला या पत्रिका नातेवाईकांना वाटाल्या. आमच्या एका नाशिक, कोल्हापुरातल्या लांबच्या नातेवाईकांकडे पत्रिका दिली. त्यांना ही पत्रिका खूप आवडली. ती घेण्यासाठी ते खास प्रवास करून आले. सध्या संकल्पना ऐकूनच समोरून विचारणा होत आहे.

नोटिफिकेशन ऑप्शन…
ज्यांनी ज्यांनी विवाहाचे संकेतस्थळ पाहिले आहे. त्यांना लग्नसोहळा किती वाजता सुरू झाला, उदा. हळदीच्या कार्यक्रमांचं त्यातील सर्व विधीच्या वेळांचं नोटिफिकेशन प्रत्येकाच्या मोबाईलवर जातं. पाहुण्यांची नाश्त्याची वेळ, लग्नाच्या एक दिवस आधी लग्नसोहळ्याची आठवण करून देण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रण देणारा मेसेज सगळ्यांना येतो, आठवण करून देण्यासाठी हा रिमाइंडर आहे. यामध्ये लगेच लोकेशनही पाहता येतं. महत्त्वाचं म्हणजे लग्नाला आलेले पाहुणे जोडप्याबरोबर फोटो काढतात. पूर्वी आठवण म्हणून अल्बम बघितले जायचे.आता हे डिजिटल फोटोजही बघू शकतात. जे पाहुणे लग्नासाठी अगदी वेळ काढून आले होते त्यांनाही त्यांची छायाचित्रे डाऊनलोड आणि शेअरसुद्धा करता येतात. लग्नानंतरही पुढील जीवनप्रवासाच्या आठवणींचा ठेवा डिजिटल निमंत्रण पत्रिकेमुळे निरंतर जपता येईल.

निमंत्रण कसं द्यायचं?
लग्नपत्रिकेवर ‘क्यू आर कोड’ दिला आहे. तो मोबाईलवरून स्कॅन केला की, तयार केलेल्या संकेतस्थळावर पत्रिका दिसते. आयफोन असेल तर कॅमेरा ओपन करून पत्रिकेसमोर ठेवला तर ती लगेच दिसते. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती बघायला मिळते. त्यामध्ये पती-पत्नींची जुनी छायाचित्रे, तसेच फक्त डिजिटल निमंत्रण नाही तर लग्नाला येणाऱया पाहुण्याला सभागृहात येण्यासाठी अडथळे येऊ नयेत याकरिता सभागृहाचा मार्ग सहज मिळण्याकरिता गुगल मॅपही बघता येतो. पाहुणे असलेल्या ठिकाणापासूनच लोकेशन यामध्ये दिसतं. त्यामुळे प्रवासाचा प्रश्न सुटतो. शिवाय येथे प्रवासासाठी लागणारी वाहने वगैरे सर्व माहिती मिळते.

विवाहाचे लाइव्ह प्रसारण
देश-परदेशातील काही पाहुण्यांना लग्नाला यायला वेळ मिळत नाही. काही पाहुण्यांना लग्नसोहळा प्रत्यक्ष पाहायचा असतो. असे पाहुणे यूटय़ुब किंवा संकेतस्थळावर लग्नाचे लाइव्ह प्रसारण बघून विवाहसोहळ्यात सहभागी झाल्याचा आनंद घेऊ शकतात, अशी माहिती प्रतीक ढोले देतात.

[email protected]