
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतरही अजूनही घोडेबाजार सुरू असल्याचे दिसत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी काँग्रेस आमदारांना 100-100 कोटी रुपये देण्याचे प्रलोभन भाजपकडून देण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप जेष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून एन. पी. प्रजापती यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपने विजय शहा यांना मैदानात उतरवले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी कमलनाथ यांनी ही डिनरडिप्लोमसी केल्याचे बोलले जात आहे. या स्नेहभोजनाला 4 अपक्ष आमदारांसह सपा आणि बसपाच्या आमदारांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे कितीही घोडेबाजार झाला तरी विधानसभेत आम्हीच बहुमत सिद्ध करणार असा विश्वास मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशात यापुर्वी 1967 साली विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान झाले होते.





























































