
>>दिलीप जोशी
काही माणसं हयातीतच आख्यायिका होतात. त्यांचं नुसतं अस्तित्व हासुद्धा आधार असतो. हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी समस्त महाराष्ट्राची हीच भावना आहे. बाळासाहेबांशी अनेकदा झालेलं फोन–संभाषण आणि चार–पाच वेळा झालेल्या भेटी हा माझ्या ‘संचिता’मधला अमूल्य ठेवा आहे.
काही माणसं हयातीतच आख्यायिका होतात. त्यांचं नुसतं अस्तित्व हासुद्धा आधार असतो. ज्या काळात माझं बालपण गेलं त्या काळात मुंबईत अशी कितीतरी मोठी माणसं राहत होती. आपापलं क्षेत्र कर्तृत्वाने गाजवलेली ही मराठी मंडळी साधेपणाने राहायची, सहज दृष्टीस पडायची. संयुक्त महाराष्ट्राचा प्रखर लढा झाला त्या वेळी ठिकठिकाणच्या छोटय़ा-मोठय़ा सभांमध्ये गर्जणारे आवाज होते प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, एसेम जोशी, कॉ. डांगे! मुंबईतल्या अनेक सभांसाठी येणारे राज्यभरातले नामवंत त्याच काळात पाहायला मिळाले. याशिवाय विविध क्षेत्रांतले दिग्गज मुंबईतच होते. भारतरत्न पां. वा. काणे, पहिल्या महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर रखमाबाई राऊत, अभिनेते केशवराव दाते, दुर्गा भागवत अशी मंडळी गिरगाव भागात राहायची, तर स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, संगी-तकार स्नेहल भाटकर, सी.रामचंद्र, सुधीर फडके, कवी राजा बढे, उतारवयातले नटवर्य बालगंधर्व, गणपतराव बोडस, चित्रपती अशी बिरुदावली लाभलेले व्ही. शांताराम आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर अशी किती किती नावं सांगावीत! परवा शिवसेनाप्र्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांची अशीच तीव्र आठवण झाली.
1955 ते 1960 च्या काळात आपल्या कुंचल्याच्या फटकाऱयांनी भल्या भल्या राजकीय नेत्यांची भंबेरी उडवणारे दोन व्यंगचित्रकार या महानगरात आपल्या कारकीर्दीचा आरंभ करत होते. बाळासाहेब ठाकरे आणि आर.के. लक्ष्मण. 1960 मध्ये ‘मार्मिक’ या नावाने सुरू झालेलं आणि बाळासाहेबांच्या वैशिष्टय़पूर्ण सहीच्या व्यंगचित्रांनी सजलेलं मराठीतलं विलक्षण ताकदीचं व्यंगचित्र साप्ताहिक घराघरांत पोहोचलं होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मोरारजी सरकारची झोप उडवणारी व्यंगचित्रे बाळासाहेबांनी निर्भयतेने चितारली होती आणि त्यांच्या व्यंगचित्रांचा प्रभाव असा की, त्यावर चर्चा होत होत्या. त्यांची मिश्कील व्यंगचित्रं दिवाळीतल्या रांगोळीचा विषय ठरत होती. मीही 1972 च्या दिवाळीत ‘फिरता कंदील’ बनवून त्याला मुंबईत नुकत्याच आलेल्या टीव्हीचं रूप दिलं होतं आणि ‘पडद्यावर’ दिसत होती बाळासाहेबांची ‘मार्मिक’ व्यंगचित्रं! पुढे एका भेटीत बाळासाहेबांना हे सांगितलं तेव्हा त्यांनी कौतुकाने, मिश्कीलपणे पाहिलं आणि म्हणाले, “म्हणजे मी घराघरांत पोहोचलो होतो तर…”
बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अनेकदा झालेलं फोन-संभाषण आणि चार-पाच वेळा झालेल्या भेटी हा माझ्या ‘संचिता’मधला अमूल्य ठेवा आहे. त्यांना मी प्रत्यक्ष पाहिलं ते मात्र शिवसेनेच्या पहिल्या सभेत. आमच्या शेजारी राहणारे रानडे यांचे मोठे बंधू प्रा. स. अ. रानडे त्या काळात ‘मार्मिक’साठी लिहीत असत. ते या सभेत बोलणार असल्याचं ठाऊक होतं. योगायोगाने त्या दसऱयाला आम्ही दादरच्या शिवाजी पार्क भागातच राहणाऱया नातेवाईकांकडे गेलो होतो. आमचे दुसरे शेजारी जगदीश सुभेदार तर नुकत्याच स्थापन झालेल्या शिवसेनेच्या सभेला जाणारच होते. त्यामुळे मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी माणसाच्या नव्या संघटनेची हवा तयार झाली होती, परंतु सणाच्या दिवशी वैचारिक सीमोल्लंघन करायला किती गर्दी होईल याचा अंदाज बाळासाहेबांनाही नव्हता, पण संध्याकाळी सारे रस्ते शिवाजी पार्कच्या दिशेने भरभरून वाहू लागले. माणसांचा महापूर आला. तुफानी सभा झाली. साध्या वेशातले बाळासाहेब ठाकरे खणखणीत आवाजात मराठी जनतेला एकजुटीचं आवाहन करत होते आणि टाळ्यांची बरसात होत होती.
कालांतराने पत्रकारितेत आल्यावर एकदा एका प्रसिद्ध हिंदी अभिनेत्याने अकारण ‘मुंबई’पेक्षा ‘बॉम्बे’ म्हणणंच कसं योग्य आणि प्रतिष्ठेचं असा उगाचच अतिशहाणपणा दाखवणारा मुद्दा मांडला. त्या वेळी मनात आलं, दुबई, हॅनोई, तैपेई, शांघाई म्हणायला यांना काही वाटत नाही. मग मुंबई म्हणतानाच यांची जीभ जड का होते? यावर लिहायला हवं. आमचे ‘श्री’चे संपादक आणि पुढे माझे जवळचे मित्र झालेले वसंत सोपारकर बाळासाहेबांना पूर्वीपासून ओळखत होते. ते म्हणाले, “बाळासाहेबांना भेट!”… आणि ती मुलाखत तासभर चालली. बाळासाहेब माझ्या वडिलांच्या वयाचे, त्यांच्या नावाचा दराराही मोठा, परंतु संवाद साधताना ते इतक्या सहजपणे बोलत होते की, आमचा अनेक वर्षांचा परिचय असावा. त्यांच्या या शैलीमुळेच ते कायम तरुण वर्गाला आपले नेते वाटत राहिले.
एकदा त्यांना भेटलो त्यांच्या व्यंगचित्रांची कारकीर्द समजून घेण्यासाठी. त्या वेळी ते ‘रविवारची जत्रा’ पूर्ण करतायत असं कळलं. मी म्हटलं, “मी पाहू का?” चष्म्यावरून बघत बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “इथे उभं राहावं लागेल.” जागतिक कीर्तीचा एक व्यंगचित्रकार ‘जत्रा’ सफाईदार कुंचल्याने चितारत होता. ते ‘फटकारे’ प्रत्यक्ष पाहायला मिळत होते. काम संपल्यावर ते म्हणाले, “बघ, कसं वाटतंय? ओळखता येतात का सगळे चेहरे?” मी अवाक झालो. म्हटलं, “लताबाईंनी गाणं गाऊन झाल्यावर प्रतिािढया विचारली तर कसं वाटेल तसं वाटतंय.” ते हसले, “हा कोण माहितेय का?” त्यांनी परीक्षाच घेतली. “अशोक मेहता.” त्यांनी माझ्यावर नजर रोखली. वाटलं, काही चुकलं की काय!…आणि ते म्हणाले, “बरोब्बर ओळखलंस. असाच चेहऱयांचा अभ्यास कर.”
या सगळ्या गोष्टी ‘संचिता’त सामावल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची ‘टेप’ केलेली एकमेव मुलाखत मुंबईतल्या अपवादात्मक पुरात नष्ट झाल्याची रुखरुख कायमची मनात राहील, पण स्मरणातल्या त्यांच्या भेटी पुसणं अशक्य!





























































