
>> दिलीप जोशी
पोस्ट खात्यातली नोकरी ते खासदारकी आणि उत्तम साहित्यकार असा ज्येष्ठ नाटककार मामा वरेरकर यांचा बहुआयामी जीवनप्रवास. सुमारे छत्तीस वर्षे मामांनी विपुल लेखन केलं. ‘ललितकलादर्श’ आणि ‘नाटय़मन्वंतर’ या संस्थांनी मामांची वेगळय़ा धाटणीची अनेक नाटकं रंगमंचावर आणली. 27 एप्रिल (1883) हा त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्त माझ्या संग्रही असलेल्या त्यांच्या एका भाषणातील हा वेगळाच पैलू.
सुप्रसिद्ध नाटककार, कथालेखक आणि ज्येष्ठ अनुवादक भा. वि. ऊर्फ मामा वरेरकर यांच्या सडेतोड स्वभावाचे अनेक किस्से त्या वेळी सांगितले जायचे. त्यातच आचार्य अत्रे यांच्याशी त्यांचा वाद रंगला आणि मराठी वाचकांना बौद्धिक मेजवानीच मिळाली. खासदार असताना वरेरकरांचं निवासस्थान पंडित नेहरूंचं घर असलेल्या ‘तीन मूर्ती भवन’समोर होतं. ते दिल्लीतल्या साहित्यिक वर्तुळातही लोकप्रिय होते. 1959 मध्ये मामांनी ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्राप्त झाला. 1938 मध्ये धुळे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
27 एप्रिल (1883) हा त्यांचा जन्मदिन. पोस्ट खात्यातली नोकरी ते खासदारकी आणि उत्तम साहित्यकार असा त्यांचा बहुआयामी जीवनप्रवास. सुमारे छत्तीस वर्षे मामांनी विपुल लेखन केलं. ‘ललितकलादर्श’ आणि ‘नाटय़मन्वंतर’ या संस्थांनी मामांची वेगळय़ा धाटणीची अनेक नाटकं रंगमंचावर आणली. त्यांचं पहिलं नाटक होतं, ‘संन्याशाचा संसार’. ते पाहायला आलेल्या लोकमान्य टिळकांनी म्हटलं ‘प्रयोग सुंदर झाला. केशवरावांचं गाणं मला फार आवडलं.’ या नाटकाचं आमंत्रण संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्वतः सरदारगृहात टिळकांची भेट घेऊन त्यांना दिलं होतं. नाटकातील विनोदी प्रसंग पाहताना टिळकांना हसू आवरत नव्हतं. कोल्हापूर येथे मामा वरेरकर यांचं ‘हाच मुलाचा बाप’ हे नाटक पाहायला छत्रपती राजर्षी शाहू महाराज आले होते! अशा दिग्गजांनी मामांचं वेळोवेळी कौतुक केलं. मामांशी वाद झालेल्या आचार्य अत्रे यांनीही ‘तो मी नव्हेच’ या त्यांच्या प्रसिद्ध नाटकाच्या साहित्य संमेलनात म्हटलं, ‘माझ्या एका बाजूला सर्वश्रेष्ठ नाटककार वरेरकर आहेत तर दुसऱया बाजूला सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक रांगणेकर आहेत. मामांचे आर्शीवाद आणि रांगणेकरांचं दिग्दर्शन कौशल्य यामुळे माझं नाटक यशस्वी होणारच.’ भार्गवराम विठ्ठल वरेरकर ‘मामा’ याच टोपणनावाने सर्वत्र ओळखले जायचे. ‘संन्याशाचा संसार,’ ‘सत्तेचे गुलाम,’ ‘हाच मुलाचा बाप,’ ‘सोन्याचा कळस,’ ‘भूमिकन्या सीता’ अशी त्यांची अनेक नाटकं सामाजिक प्रबोधन करणारी होती. अशा या मामांनी उतारवयात एका वेगळय़ाच विषयावर ‘मार्ग’दर्शन केले. तेही त्यांच्या खास मिश्कील शैलीत. विषय होता ‘रस्ते सुरक्षितपणे कसे ओलांडावे?’ त्यांचं हे भाषण ध्वनिमुद्रित आहे. त्यात ते म्हणतात.
‘…मी मामा वरेरकर. आपण मला ओळखत असालच. सूज्ञ नागरिकांनो, रस्त्यावर होणारे अपघत कसे टाळावेत याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे… आपण माझे बोलणं ऐकत असाल त्या वेळी शेकडो लोक अपघातात दगावत असतील. आपण म्हणाल ‘आम्ही काय करावं त्याला? ज्याचं आयुष्य संपलं तो जाणारच.’ त्यावर माझं उत्तर हेच की, बाबांनो, हा दैववाद योग्य नाही. रस्त्यानं चालणं ही एक कला आहे आणि ती आपल्याला शिकायला हवी. स्वतःची, स्वतःवर अवलंबून असणाऱयांची आणि इतरेजणांची जबाबदारी आपण ओळखायला हवी. जिथे फुटपाथ असतील तिथे फुटपाथावरून चालण्याची सवय ठेवा. जिथे ते नसतील त्या रस्त्यावर उजव्या बाजूने, अगदी कडेनं चालण्याचा परिपाठ ठेवा. म्हणजे समोरून येणारी रहदारी आपल्याला दिसून सुरक्षितपणानं चालणं सोपं होईल… रस्त्यानं चालणं ही एक कला आहे खरी, पण रस्ता ओलांडणं म्हणजे एक मोठं कोडं आहे. त्याला उपाय एकच. रस्ता ओलांडण्यापूर्वी जरा थांबा आणि रहदारीचा कानोसा घ्या. उगीच चाळवाचाळव करून किंवा मागंपुढे वळून, अथवा टुणकन् उडी मारून मोटारींना चुकविण्याचा प्रयत्न करू नका. वाहतुकीसाठी चौरस्त्याला असलेले खुणेचे लाल-हिरवे दिवे आणि वाहतूक पोलिसांचे हुकूम वाहनांप्रमाणे पायी चालणाऱयांनाही आहेत हे लक्षात ठेवा. जरा काळजी घेतली आणि सावधगिरी बाळगली की अपघात शक्यतो होणार नाही. आपणावर कुणीतरी अवलंबून आहे हे विसरू नका. परलोकी लवकर पोचण्यापेक्षा, इहलोकातच थोडा जास्त उशीर लागला तरी चालेल!…’
एका विख्यात साहित्यिकाचं हे सामान्यांसाठीचं मनोगत आजही किती उपयुक्त आहे ते लक्षात येतं. रेल्वे ट्रेनचा प्रवास तिकीट काढून का करावा यावर मला वाटतं महात्मा गांधींचाही संदेश ध्वनिमुद्रित झालेला आहे. जीवनाचा सर्वसमावेशक विचार करणारी ही मोठी माणसं. त्यांच्या विचारातला काही भाग त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित होऊन राहिला आहे. (दातारांच्या संग्रहातून मला मामांच्या भाषणाचं हे ध्वनिमुद्रण चाळीस वर्षांपूर्वी मिळालं.)

























































