
- दिलीप जोशी, [email protected]
काळ कुणासाठीही थांबत नाही. तो अव्याहत असतो. सतत असतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवतीही फिरते. त्याचं गणित मांडून आपण ‘कालगणना’ करतो. दिवस आणि रात्रीचा हिशेब करत तीनशे पासष्ट दिवस लोटले की एक वर्ष झालं असं म्हणतो. तिकडे दूर अंतराळात सारं काही सततच असतं. तिथे काल-आज-उद्या वगैरे काही नाही. पण आपल्या सोयीसाठी आपली कालगणना महत्त्वाचीच. त्यातही विविध संस्कृतींच्या विविध कालगणना. बऱयाचशा चांद्रमासावर आधारित. आपण हिंदुस्थानात परंपरेने चांद्रकालगणनेचा हिशेब करतो. म्हणून चैत्र पाडव्याला आपलं नवं वर्ष सुरू होतं. ती गणना पृथ्वीच्या सौर परिक्रमेपेक्षा थोडी कमी भरते. म्हणून मग दर तीन वर्षांनी ‘अधिक मास’ येतो आणि सौर-चांद्र गणनेचं गणित जुळतं. पारंपरिक सण-उत्सवासाठी आपल्याच देशात अनेक चांद्र-कालगणना आहेत. गुजरातचं नवं वर्ष दिवाळीतल्या पाडव्याला सुरू होतं तर तामीळनाडूत ते ‘चिथ्थीराई’ला सुरू होतं.
मात्र आपण व्यवहारात वापरतो आणि जगातही जी कालगणना सार्वत्रिक झाली आहे ती ‘ग्रेगरियन पॅलेंडर’प्रमाणे केली जाणारी सौर वर्षाची कालगणना. त्यातल्या पूर्वीच्या त्रुटी दूर करत 1582 च्या ऑक्टोबरपासून आताची तीनशे पासष्ट दिवसांची आणि दर चार वर्षांनी एक जास्त दिवस (29 फेबुवारी) धरून त्या वर्षापुरती तीनशे सहासष्ट दिवसांची कालगणना होते. त्याच हिशेबाने 2021 हे वर्ष संपत आलं. समुद्रात लाटेमागून लाट येत राहावी तसा हा दिवस-रात्र, महिना आणि वर्षांचा खेळ. आता येईल ते 2022. विसावं शतक संपून एकविसावं शतक सुरू झालं तेव्हा म्हणजे 2001 च्या आरंभी एक सहस्रकही (हजार वर्षांचा कालावधी) संपला होता. त्या घटनेचं अप्रूप वाटूनही आता एकवीस वर्षे झाली. म्हणजे नवं ‘सहस्रक’ आता वयात आलंय. नव्या युगाच्या नव्या संकल्पना आत्मसात करत आणि जुन्यातलं जेवढं ‘सोनं’ आहे ते सांभाळून ठेवत मानवसमाजाला पुढे जायचं आहे.
नित्यनवे लागणारे वैज्ञानिक शोध, पृथ्वीच्या पलीकडे जाण्याची माणसाची इच्छा, त्यासाठी चाललेले अथक प्रयत्न ही सारी अचंबित करणारी प्रगती आणि सायबर जगताने अवघ्या पृथ्वीचं ‘ग्लोबल व्हिलेज’ केल्याचा परिणाम ही या सहस्रकाच्या आरंभापासून मिळालेली देणगी. त्याचा नेमका वापर आपण कसा करतो त्यावर मानवी समाजाचं भवितव्य अवलंबून. आपणच आपले तारणहार आहोत. सद्बुद्धीने वागल्यास विनाशापासून स्वतःचं रक्षण करण्याइतपत प्रगती झालेली आहे. परंतु तरीही नैसर्गिक गोष्टींवर शंभर टक्के विजय प्राप्त करणं शक्य नाही. आता निसर्गाला समजून, त्याच्याशी मैत्री करूनच पुढच्या गोष्टींची आखणी करावी लागेल.
गेल्या दोन वर्षांत पृथ्वीव्यापी धूमाकूळ घालणारा कोविड-19 ऊर्फ कोरोना कमी होत असला तरी मानवी समूहाची पाठ सोडायला तयार नाही. परीकथेतल्या मायावी राक्षसासारखा तो ‘म्युटेशन’च्या पद्धतीने रूपं बदलतोय. गेल्या काही महिन्यांत सारं काही आलबेल असल्याचा निःश्वास टाकता टाकताच ‘ओमायक्रोन’ नावाचा कोरोनाचा नवा अवतार जगाला भेडसावू लागलाय. पुढे काय वाढून ठेवलंय याची चिंता संपता संपेना, अशी परिस्थिती आहे.
त्याचबरोबर प्रदूषणाचा कहर आणि त्यातून निर्माण होणाऱया ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे बदलता मोसम ही आता केवळ पुस्तकी पिंवा चर्चेची गोष्ट राहिलेली नाही, तर त्याचे तडाखे प्रत्यक्षपणे सर्वांनाच बसू लागले आहेत. आपल्या कोकण किनाऱयावर पिंवा मराठवाडय़ात वाऱया-वादळाने अकाली घातलेलं थैमान आपण सलग, दोन-तीन वर्षं अनुभवत आहोत. यातून प्रगत देशांचीही सुटका झालेली नाही. अमेरिकेत अवकाळी पाऊस-वादळाने ‘प्रगत सिस्टिम’ कोलमडून पडण्याइतका उत्पात घडवला. चीन-जपानचीही त्यातून सुटका झाली नाही. मध्यपूर्वेतही अरिष्ट आणणारी वादळं झाली. म्हणजे एकूणच ‘ग्लोबल’ नैसर्गिक संकटांच्या धोक्याच्या घंटा वाजू लागल्या आहेत.
आपल्याकडे दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. तिकडे फिलिपिन्स वगैरे काही देशात अशीच स्थिती वर्षातून एकदा तरी उद्भवते. मुंबईतही हवा ‘खराब’ असण्याचे दिवस वाढत असतील तर सावध असणं सर्वांसाठीच गरजेचं. सारं काही सरकारने करावं असं म्हणून चालणार नाही. व्यक्तीपासून या कर्तव्याची सुरुवात होते. प्लॅस्टिकला पायबंद घालावाच लागेल. आपल्याही जीवनपद्धतीत काही बदल करावे लागतील. निराश होऊन चालणार नाही. ही नव्या युगाची नवी आव्हानं समजून नव्या उमेदीने आणि जिद्दीने त्यांना सामोरं जावं लागेल. सरत्या वर्षाला निरोप देताना या गोष्टी लक्षात घेऊया. कारण कालगती कुणासाठीही थांबत नसते!






























































