डीएनए चाचणीविना रखडलेल्या दत्तक विधानांचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डीएनए चाचणीच्या अहवालाअभावी बालकांना दत्तक घेण्याची प्रक्रिया रखडली होती. पण यामध्ये डीएनए चाचणी अहवाल प्राधान्याने देण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिले. त्यामुळे अनेक बालकांचा नव्या घरातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासंदर्भातील एक बैठक गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला आणि बालकल्याणमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात माहिती देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, राज्यातील अनेक बालकांचा नव्या कुटुंबामध्ये प्रवेश रखडला होता. बालकांच्या डीएनए चाचणीविना त्यांच्या दत्तक विधानांचा मार्ग मोकळा होत नव्हता. यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे डीएनए चाचणी करून घेणे अत्यावश्यक होते. त्यामुळे ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्व परिस्थिती समजून घेतल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी न्यायवैद्यक चाचणी अहवाल प्राधान्याने देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.