दिंडोशीतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील समस्यांचे लवकरच निराकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिंडोशी येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील विविध समस्यांचे लवकरच निराकरण होणार आहे. त्यासंदर्भातील आश्वासन राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदार सुनील प्रभू यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिले असून यामुळे येथील शेकडो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिंडोशी प्रभाग क्रमांक 41 येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील विविध समस्यांबाबत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या दालनात शिवसेना आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू, नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्यासमवेत राज्याचे शिवशाही प्रकल्पातील काही प्रमुख पदाधिकाऱयांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस आमदार सुनील प्रभू यांच्यासमवेत मुंबईचे उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील प्रमुख पदाधिकारी वसीम शेख, रोशन शेख, अक्रमनयमी शहा, फिरोज खान, रघुनाथ कोठारी, नडगरी शेख, हाबिद आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवशाही प्रकल्प 2002 साली पूर्णत्वास आला. कुर्ला, जरी मरी, एअरपोर्ट येथील प्रकल्पबाधित 2600 नागरिकांचे येथील 33 इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले. शिवशाही प्रकल्पातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पावसाळी पाणी वाहून नेणारे मोठे नाले व मलनिस्सारण वाहिनीची दुरवस्था, पाणीगळती या समस्यांनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. सदर समस्या सुधारणे अत्यंत गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी आमदार सुनील प्रभू यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली. या बैठकीत जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पचा पुनर्विकास करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली.