भाजप कार्यकर्त्यांनी माझ्यावर शेण फेकले! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । त्रिशूर

पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रियनंदन यांच्यावर भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी शेण फेकून हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शबरीमला मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादात प्रियनंदन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून उडी घेतली. त्या पोस्टमुळे चिडलेल्या भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘मी सकाळी जेव्हा घराबाहेर पडलो त्यावेळी काही लोकांनी मला अडवले. माझ्या पोस्टवरून ते चिडले असल्याचे मला कळले. त्यानंतर त्यांनी माझ्यावर शेण फेकले व माझी पोस्ट मला डिलीट करायला लावली. त्यांनी मला धक्काबुक्कीही केली. ते भाजप व संघाचे कार्यकर्ते आहेत असा मला संशय आहे’ असे प्रियनंदन यांनी सांगितले. या प्रकरणी प्रियनंदन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘आपले मत व्यक्त केले म्हणून जर लोकांवर असे हल्ले होणार असतील तर ते आम्ही सहन करणार नाही. संघ परिवार उत्तर हिंदुस्थानसारखा हल्ल्यांचा पॅटर्न आता इथे आणत आहे’, अशी टीका विजयन यांनी केली आहे. दरम्यान भाजपचे सचिव केबी, गोपालकृष्णन यांनी मात्र या हल्ल्यात भाजपचा हात नसल्याचे सांगितले आहे.