
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार दिव्यांग बांधवांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय महापौरांकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर लॉकडाऊनमध्ये बंद असलेले टेलिफोन बुथही सुरू झाले आहेत. शिवाय पालिकेकडे प्रलंबित असणाऱया मागण्याही लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
दिव्यांगांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी यासाठी शिवसेना अपंग सहाय्य सेना व सिद्धिविनायक अंध-अपंग संस्थेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. शिवाय टेलिफोन बूथ सुरू करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. यातच दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रभाग समितीच्या माध्यमातून नगरसेवक दत्ता पोंडगे यांच्याकडे शिवसेना अपंग सहाय्य सेनेने केलेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणाऱया निधीचा विनियोग पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करून दिव्यांगांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दिव्यांगांना बजेटमधील आरक्षित निधीतून मासिक पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याचे अपंग सहाय्य सेनेचे सरचिटणीस सुभाष कदम यांनी सांगितले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिव्यांग बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे यांनी सांगितले. यावेळी शाखाप्रमुख जयसिंग भोसले, शाखा संघटक अनुराधा इनामदार आदी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
- लॉकडाऊन काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पालिकेने आर्थिक सहाय्य करावे.
- टेलिफोन बूथधारकांच्या परवान्यावरून ‘हॉकर्स’ हा शब्द काढून टाकावा.
- टेलिफोन बूथवर सर्व प्रकारच्या वस्तू विकण्याची परवानगी द्यावी.
- दिव्यांगांचे प्रश्न वेगाने सोडवण्यासाठी पालिकेने ‘दिव्यांग कल्याण विभागा’ची स्थापना करावी.
- पालिकेकडून होणाऱया स्कूटर वाटपात सूसुत्रता आणावी. प्रकिया वेगाने करावी.


























































