संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत एनडीआरएफच्या जवानांकडून नदीपात्रामध्ये आपत्तीप्रसंगी बचाव प्रात्यक्षिके करण्यात आली. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एनडीआरएफचे प्रमुख महेंद्रसिंग पुनिया यांच्या उपस्थितीत कृष्णा नदीपात्रामध्ये हे प्रात्यक्षिक संपन्न झाले.
यामध्ये प्रत्यक्ष आपत्तीकाळात नदीपात्रामध्ये किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करायचा, यासाठी कोणकोणती घरगुती साधने वापरायची, याची माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष नदीपात्रात जवानांनी उतरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपला बचाव कसा करू शकतो, हे सर्वांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दाखवून दिले.
दि. 16 जूनपासून एनडीआरएफची टीम सांगलीमध्ये दाखल झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफ अशा संयुक्तरीत्या विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. आज प्रत्यक्ष नदीपात्रामध्ये या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना एनडीआरएफच्या जवानांनी आपत्ती काळातील बचाव प्रात्यक्षिके दाखविली. एनडीआरएफची टीम ही 30 ऑगस्टपर्यंत सांगली जिह्यामध्ये असणार आहे. तसेच उद्यापासून जिह्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देणार आहे. यदाकदाचित पूरपरिस्थिती उद्भवली तर त्याला सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफ यंत्रणा ही सर्व यंत्रणेसहित सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एनडीआरएफ पथकप्रमुख यांनी माध्यमांना सांगितले.
या प्रात्यक्षिकांवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, चंद्रकांत खोसे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, सहायक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह महापालिका, महसूल, पोलीस मंडळ यांचे अधिकारी आणि प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित होते.