
लातूर येथील तहसील कार्यालयाच्या पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली. सदरील वाहने जप्त करुन काही वाहने पोलीस ठाण्यात तर काही वाहने तहसील कार्यालयात नेऊन लावली. परंतू अप्पर जिल्हाधिकारी यांनीच दमबाजी करुन ही वाहने सोडून देण्यास भाग पाडले. शिवसेना तालूकाप्रमुख रमेश पाटील यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शिवसेना तालूकाप्रमुख रमेश पाटील यांनी नमूद केले आहे की, दि 18 डिसेंबर रोजी रात्री 3.30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान लातूर तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 10 गाड्या पकडल्या. त्या गाड्यांवर व त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यासाठी स्थळ पंचनामे करण्यात आले. काही वाहने पोलीस ठाण्यात नेऊन लावण्यातही आली तर काही वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आली होती.
लातूर येथील अप्पर जिल्हाधिकारी यांनी तहसील कार्यालयात लावण्यात आलेली 3 वाहने कर्मचाऱ्यांना दमबाजी करीत दंड व कारवाई न करता सोडून देण्यास भाग पाडले आहे. या पुर्वीही लातूरच्या तहसीलदारांनी काही वाहने पकडली असता अप्पर जिल्हाधिकारी यांनी ती वाहने सोडून देण्यास भाग पाडले होते. कर्मचाऱ्यांवर दडपशाही करुन वाहने सोडून देण्यास भाग पाडणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कडक कारवाई करण्यात यावी. सोडून दिलेल्या वाहनांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करावी अन्यथा शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देताना तालूका संघटक बाबूराव शेळके, महादेव काळे, वैâलास पाटील, विशाल शिंदे, विष्णू शिंदे यांच्यासह इतरांचा सहभाग होता






























































