दिशा रवी हिला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट प्रकरणातील आरोपी दिशा रवी आणि शंतनू मुळूक यांची आता समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. पतियाळा न्यायालयाने आज तिची तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यावेळी न्यायालयाने तिला पोलीस कोठडी देण्याची दिल्ली पोलिसांची मागणी फेटाळून लावली.

ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला समर्थन देताना ट्विट केलेल्या टूलकिटचा एक भाग दिशा रवीने संपादित केल्यामुळे तिच्यावर राष्ट्रविरोधी कारस्थान रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र आपण शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसे केले होते असा तिचा दावा आहे. 15 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथून तिला अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत तिची कसून चौकशी करण्यात आली.

‘दिशा ही इतर आरोपींना दोष देत असल्याने तिची दुसरा आरोपी शंतनू मुळूकसोबत समोरासमोर चौकशी करण्याची गरज आहे. 22 फेब्रुवारीला शंतनूची चौकशी केली जाणार असल्याने दिशाला पोलीस कोठडीतच ठेवण्यात यावे’ अशी विनंती दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला केली होती. दरम्यान, दिशानेही पोलिसांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपले व्हॉट्सअॅप चॅट व अन्य माहिती लिक करू नये अशी मागणी तिने त्यात केली आहे. त्यावर न्यायालयाने दिशाच्या कोणत्याही अधिकारांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले.