मूव्ही वर्ल्ड; डिस्ट्रिक्ट 9

>>डॉक्टर स्ट्रेंज

एलियन्स अर्थात परग्रहवासीयांवर आधारलेल्या चित्रपटांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. अचानक पृथ्वीवर आलेले एलियन्स, त्यांच्या महाकाय उडत्या तबकडय़ा, आधुनिक तंत्रज्ञान, विनाशकारी शस्त्रास्त्र आणि जगभरातील लोकांनी एकजुटीने केलेला त्यांचा प्रतिकार अशी सर्वसाधारण एलियन्स चित्रपटांची कथा जगभर आढळते. काही निवडक चित्रपटांमध्ये अंतराळात गेलेले अंतराळवासी, त्यांचे फसलेले मिशन किंवा यानाला झालेला अपघात आणि त्यांचा एलियन्सशी सामना होणे असे कथानकदेखील आढळते. मात्र हे सर्व चित्रपट आश्चर्यकारक तंत्रज्ञान, भव्यता, आधुनिक शस्त्र, मानवांची एकजूट अशा गोष्टींवर भर देताना दिसतात. ‘डिस्ट्रिक्ट 9’ चित्रपटाची कथा मात्र एकदम हटके आहे. मानवी भावनांबरोबरच एलियन आणि मानवांच्या संबंधावर भाष्य करणारी, मानवाचा हव्यास दाखवणारी आणि एलियन्सचे एक वेगळे रूप समोर आणणारी आहे.

चित्रपटाची कथा 80 च्या दशकात सुरू होते. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरावर एक प्रचंड मोठे स्पेसशिप येऊन स्थिरावले आहे. अवकाशात काही फुटांवर असलेल्या या स्पेसशिपमधून कोणत्याही क्षणी एलियन्स उतरतील आणि हल्ला सुरू होईल या भीतीच्या अमलाखाली काही दिवस जातात. मात्र एलियन्सकडून काहीच हालचाल होत नाही. शेवटी सरकारच्या आदेशाने सैन्य या महाकाय स्पेसशिपवर हल्ला करते. मात्र या हल्ल्याचादेखील प्रतिकार होत नाही. आता कथेत एमएनयू या शस्त्रांची निर्मिती करणाऱया मोठय़ा कंपनीचा आणि या कंपनीचा कर्मचारी आणि आपला हीरो विकसचा प्रवेश होतो.

कंपनीचे काही कर्मचारी सरकारी परवानगीने या स्पेसशिपमध्ये प्रवेश करणार असल्याचे आपल्याला विकसकडून कळते. त्याप्रमाणे ते स्पेसशिपमध्ये प्रवेशदेखील करतात. मात्र तिथे हिंसक एलियन्सऐवजी गलितगात्र झालेले आणि स्वत:ला भीतीने स्पेसशिपमध्ये कोंडून घेतलेले अनेक एलियन्स त्यांना आढळतात. सैन्याच्या पहिल्या हल्ल्यात या एलियन्सचे नेतृत्व करणारे सर्व जण मारले गेलेले असल्याने फक्त आज्ञा पाळायची सवय असलेले हे एलियन्स पुढे काय करावे हे न उमगल्याने स्वत:ला कोंडून घेऊन बसलेले असतात.

हल्ल्यात क्षतिग्रस्त झालेले स्पेसशिप दुरुस्त होईपर्यंत या एलियन्सना पृथ्वीवर ठेवण्याचे ठरवले जाते आणि त्या स्पेसशिपखाली असलेल्या घरातील लोकांना स्थलांतरित करून तिथे एलियन्सची वस्ती वसवली जाते. या घटनेला अनेक वर्षे उलटतात. एलियन्स अजूनही पृथ्वीवर आहेत. त्यांचा अहिंसक स्वभाव बघून आता एका नायजेरियन माफियाने ‘डिस्ट्रिक्ट 9’मध्ये आपल्या गुंडांसह बस्तान बसवले आहे. अन्नाच्या बदल्यात तो एलियन्सकडून त्यांची शस्त्रs ताब्यात घेतो आहे. मात्र ही शस्त्रs एलियन्सच्या डीएनएनेच चालू शकत असल्याने त्याने आता एलियन्सना मारून त्यांचे मांस खायला सुरुवात केली आहे. त्याला आशा आहे की, यामुळे त्याच्या डीएनएमध्ये बदल घडेल.

भुकेले एलियन्स आता त्यांची हद्द सोडून इतर भागांत प्रवेश करायला लागतात. त्यामुळे मानव आणि एलियन्स यांच्यात लहानमोठय़ा झटापटी सुरू होतात. हे एलियन्स अजून पृथ्वीवर का आहेत? असा सवाल करत सर्व लोक रस्त्यावर उतरतात. मात्र एमएनयू कंपनीलादेखील एलियन्सच्या शस्त्रांमध्ये रस आहे आणि ही कंपनी त्यासाठी गुप्तपणे एलियन्सवर विविध घातक प्रयोग करत आहे हे जनतेला माहिती नसते. आता लोकांच्या प्रचंड दबावाखाली सरकार एमएनयू कंपनीला एलियन्स ‘डिस्ट्रिक्ट 9’मधून दुसरीकडे हलवण्याचा आदेश देते.

या मोहिमेचे नेतृत्व विकसकडे देण्यात येते. इकडे ‘डिस्ट्रिक्ट 9’मध्ये ख्रिस्तोफर नावाचा एक एलियन आपला मुलगा सीजे आणि पॉल नावाच्या मित्राच्या मदतीने एक गुप्त प्रयोगशाळा चालवत असतो. स्पेसशिपला पुन्हा कार्यान्वयित करणारे ब्लॅक फ्युएल तयार करण्यात त्याला 20 वर्षांनी यश मिळालेले असते. मात्र त्याच वेळी एलियन्सच्या शिफ्टिंगची मोहीम आड येते आणि हे फ्युएल नेमके विकसच्या हाताला लागते. हे फ्युएल परत मिळवण्याच्या प्रयत्नात पॉल मारला जातो आणि हे फ्युएल हाताळताना चूक झाल्याने काही फ्युएल विकसच्या चेहऱयावर उडते.

विकसच्या संपर्कात आल्यावर हे फ्युएल आपला कारनामा दाखवायला सुरुवात करते आणि विकस हळूहळू एलियनमध्ये रूपांतरित व्हायला सुरुवात होते. त्याचा एक हात पूर्णपणे एलियनच्या हाताप्रमाणे बदलतो. त्याच्या या हाताने एलियन्सची शस्त्रास्त्र सुरू करण्यात एमएनयू कंपनीला यश मिळते आणि आता ते विकसवर विविध प्रयोगांची तयारी सुरू करतात. धास्तावलेला विकस तिथून पळ काढतो आणि ‘डिस्ट्रिक्ट 9’मध्ये आश्रय घेतो.

भन्नाट कथानक असलेल्या या कथेत पुढे काय होते? विकस बरा होतो का? स्पेसशिप पुन्हा आपल्या ग्रहाकडे नेण्यात ख्रिस्तोफर यशस्वी होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ‘डिस्ट्रिक्ट 9’ पडद्यावर अनुभवायची मजा नक्की घ्या.