
>> दिव्या नेरुरकर–सौदागर
लहान मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या काही क्लेशकारक घटनांपैकी एक घटना म्हणजे आईवडिलांचा होणारा घटस्फोट. यात मुलांची अक्षरश कुचंबणा होत असते. ती मनाने खरं तर या कटू प्रसंगासाठी तयार नसतात. त्यांना बऱ्याचदा तयार केलं जातं. “मला आता माझे आई/वडील कधीच दिसणार नाहीत” या विचाराने ती सैरभैरही होऊ शकतात. याचा परिणाम साहजिकच त्यांच्या शरीर आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो.
नूपुरचं (नाव बदलले आहे) हल्ली टेन्शन खूपच वाढलेलं होतं. कारण आर्वीचे (नाव बदलले आहे) प्रश्न खूपच वाढलेले होते. आर्वी ही फक्त सहा वर्षांची होती, पण भयंकर जिज्ञासू. सगळ्या गोष्टींवर तिचं बारीक लक्ष असायचं आणि त्यात मोठी माणसं काय बोलताहेत याकडेही तिचे जास्त कान असायचे. सुरूवातीला नूपुरला तिच्या बोलण्याचं कौतुक वाटायचं. “आली आमची आज्जीबाई” म्हणत ती हसत सुटायची, पण आता मात्र तिला आर्वीचं असं मोठ्या माणसांमध्ये बोलणं नकोसं झालं होतं. एकदा तर तिने तिला त्यावरून मारलंही.
घटनाच अशी घडली होती. त्या दिवशी घरात सगळे जण म्हणजे नूपुरचे आईवडील, तिची मोठी बहीण आणि बहिणीचा नवरा असे सर्व पुढच्या गोष्टी ठरवण्यासाठी एकत्र बसले होते. नूपुर तिच्या नवऱ्यासोबत राहणार नव्हती. तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा होता. तिने तशी त्याला कायदेशीर नोटीसही पाठवली होती. नूपुरची आई बोलता बोलता रडत होती. तेवढ्यात “माझ्या स्वीट बाबाला काही बोलू नको आज्जी” म्हणत आर्वी तिच्याकडे झेपावली. “मला माझ्या बाबाकडे जायचंय” म्हणत नूपुरच्या आईला मारायला लागली. नूपुर आधीच त्रासलेली होती. त्या आर्वीचं हे असं बोलणं आणि आजीला मारणं हे तिला सहन झालं नाही. तिने त्याच आवेगात आर्वीला मारलं. आर्वी रडायला लागल्यावर तिलाच वाईट वाटलं. समुपदेशनाला आल्यावर तिने हा सर्व प्रसंग कथन केला. “आता मी आर्वीला काय सांगू? मी आणि तो नाही एकत्र संसार करू शकत” असं सांगत नूपुरने तिच्या निर्णयाची पार्श्वभूमी सांगितली. ती आणि नवरा आता वेगळं होण्याच्या मार्गावर होते. समुपदेशन खरं पाहता आर्वीसाठी होते. नूपुर आर्वीबरोबर दोन महिन्यांपूर्वीच तिच्या आईकडे रहायला आली होती. ती तिला कामालाही जाऊ देत नव्हती. रोज ऑफिसला जाताना आर्वीची रडारड बघून नूपुरचा पाय निघत नसे. तिचा अभ्याससुद्धा अपूर्ण असायचा. सरतेशेवटी शाळेने नूपुरला याबद्दल सांगून समुपदेशन घेण्याचा सल्ला दिला. आर्वीची जुजबी ओळख करून घेण्यासाठी तिला बोलतं केलं गेलं तेव्हा तिने पटकन विचारलं, “माझे आई-बाबा एकत्र येणार नाहीत का?”
आर्वीला आता प्राप्त परिस्थितीची जाणीव करून देणं आणि तिला सांभाळणं हे नूपुरसाठी शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. कारण दिवसेंदिवस आर्वीचे वाढत जाणारे प्रश्न, तिचं मोठ्या माणसांच्या संभाषणांमध्ये भाग घेणं, आपल्या वडिलांविषयी जरा काही नकारात्मक प्रतिक्रिया आल्या की, ताडकन व्यक्त होणं हे नूपुरसाठी डोकेदुखी ठरत होतं. आर्वीबरोबर बोलण्याआधी काही गोष्टी या नूपुरला सांगाव्या लागणार होत्या. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या नवऱ्याविषयी सतत नकारात्मक न बोलणं आणि आर्वीसमोर तर नाहीच नाही. कारण जरी काही दोघांमधील खासगी वाद होते, ते समजून घ्यायला ती निश्चितच लहान होती. “पण मॅम, आमची आर्वीसमोर भरपूर भांडणं व्हायची. मग आता तिला समजलं तर वावगं काय?” नूपुरचा स्वाभाविक प्रश्न आला. “तरी तिला बाबा का आवडतो?” असं तिला विचारल्यावर चॉकलेट्स आणायचा तो” असं काहीशा घुश्शातच ती उत्तरली. “म्हणजेच आर्वीच्या ज्या बालसुलभ गरजा त्याच्याकडून पूर्ण होत होत्या आणि तिच्यावर तो एक बाबा म्हणून प्रेम करत होताच ना?” असं विचारल्यावर ती शांत बसली.
लहान मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या काही क्लेशकारक घटनांपैकी एक घटना म्हणजे आईवडिलांचा होणारा घटस्फोट. याचा परिणाम त्यांच्या शरीर आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो. जसे की; झोपेच्या समस्या, भीतिदायक स्वप्ने, तहान/भूक नसणे, घरी यावेसे न वाटणे, नैराश्य, चिडचिड, आत्मविश्वास गमावून बसणे, गोंधळून जाणे, कशातही मन न रमणे, एकटेपणाची जाणीव
या आणि बऱ्याच विषम परिस्थितीतून मुलं जात असतात. त्यात जर त्यांना या घटनेचा सामना दुर्दैवाने करावा लागलाच तर त्यांना सांभाळून घेणं हे आव्हानात्मक असतं. अर्थातच नूपुरला हे आव्हान पेलायचं होतं, पण त्याआधी तिला स्वतला मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावं लागणार होतं.
प्रत्येक सत्रागणिक नूपुरमध्ये फरक पडत होता. तिचा गोंधळ आणि चिडचिड कमी होत होती. त्याचप्रमाणे आर्वीबरोबरही सत्रे चालू झाली होती. सुरूवातीला तिला हे सत्य स्वीकारणे साहजिकच खूप जड गेले, पण बाबाशी एक-दोन वेळा फोनवर बोलणं झाल्यावर ती हळूहळू शांत झाली. “माझ्या बाबाने मला सांगितलं की, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि राहणार” असं आर्वीने एके दिवशी आनंदाने सांगितलं आणि त्याच दिवशी ती तिच्या पुढील आयुष्यासाठी तयार झाली आणि नूपुरनेही सुटकेचा निःश्वास सोडला.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)




























































