
>> गणेश चंदनशिवे
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. अनागर ते नागर अशी आपली जीवनशैली बदलली तरी दिवाळीशी जोडलेली लोकसंस्कृती, प्रथा, परंपरा आजही तितक्याच उत्साहाने साजऱया केल्या जातात. मग ती वसुबारस असो वा शेणापासून केलेला बळीराजा, त्याच्या गवळणी आणि पांडवांची पूजा असो.
महाराष्ट्रात ऋतुपरत्वे सणांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. श्रावणात शिवभक्ती, त्यानंतर गणेशभक्ती, नवरात्रौत्सव, दसरा आणि दसऱयानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, अश्विन आणि कार्तिक महिन्याच्या संधिकाळात मुख्यत्वे दीपावली हा सण साजरा करतात. दीपावलीला दीपोत्सवाच्या रूपाने महाराष्ट्रात वातीचे दिवे लावून प्रकाशमय करून साजरा केला जातो. हिंदुस्थानात सर्वत्र साजरा होणारा हा सण अतिप्राचीन असून त्याला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. या काळात लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटते. ऐन थंडीच्या काळात येणारी दिवाळी शेतकऱयांच्या जीवनात आनंदमय वातावरण घेऊन येत असते. खरीपाचा हंगाम संपून रब्बीचा हंगाम सुरू होतो आणि खळय़ा दळय़ाची रास पुजून शेतकऱयाच्या हातांमध्ये पै-पैसा येतो. लक्ष्मीच्या रूपाने ऐन दीपावलीच्या दिवशी प्रकाशमय वातावरणात धार्मिक विधी म्हणून ’लक्ष्मीपूजन‘ केले जाते. लक्ष्मीपूजनाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाल्याने या उत्सवात निरनिराळय़ा दिवशी विधी केले जातात. दिवाळीच्या उगमासंबंधित ऐतिहासिक पुरावे सापडतात. सम्राट अशोक दिग्विजय होऊन आल्याच्या नंतर हा महोत्सव सुरू झाला. त्यालाच ‘दीपोत्सव‘ किंवा ‘शुभ दीपावली’ असे म्हटलेले आहे. सम्राट चंद्रगुप्त, विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभात जो आनंदोत्सव साजरा केला त्यात दीपमाळा पेटवून सगळीकडे आनंदाच्या वातावरणात दीपोत्सव साजरा केला. तेव्हापासून हा सण आजतागायत लक्ष्मीपूजनाच्या रूपाने साजरा होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी उंच जागी तेलाचे दिवे लावून घरातील धनसंपत्ती, सोने, अलंकार स्वच्छ करून नीट ठेवतात. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, गणेश या देवतांचे पूजन करून अखंड दीप लावण्याची परंपरा पुराणात सापडते. लक्ष्मीपूजन अश्विनी अमावस्याच्या दिवशी साजरी करतात. रामप्रहरी मंगल स्नान करून देवतापूजन केले जाते. चौरंगावरती लक्ष्मीचे प्रतीक ठेवून लक्ष्मी, विष्णू देवता, कुबेर यांचे पूजन करतात. लक्ष्मीदेवतेला लवंग, वेलची, गाईच्या खव्याचा नैवेद्य देऊन पै-पाहुणे, आप्तेष्टांना मानसन्मानाने घरी बोलावून बोळवण केली जाते. नंतर सामूहिक भोजनाचे आयोजन करून करंजी, लाडू, चकल्या, शंकरपाळी, चिवडा इ. मिष्ठान्न सग्या-सोयऱयांना देण्याची प्रथा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांती लाभावी म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म आणि भोजनदान करण्याची प्रथा अतिप्राचीन आहे. जिथे स्वच्छता, प्रामाणिकपणा, शोभा, रसिकता आढळते. तिथेच लक्ष्मी आकर्षित होते अशी लोकमानसाची भावना आहे. शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त व क्षमाशिल पुरुष त्याचप्रमाणे गुणवती, पातिव्रत्य जपणारी स्त्री वास्तव्य करते त्याच घरी लक्ष्मी उदार अंतःकरणाने संचार करत असते.
कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यत सर्व हिंदुस्थानात दिवाळीचे स्वरूप साधारणपणे सारखेच असते. घर स्वच्छ झाडून, सारवून, रंगवून, आकाशपंदिल, तोरणे वगैरे लावून सुशोभित करतात. निरनिराळय़ा राज्यात दिवाळी वेगवेगळय़ा प्रकारे साजरी करतात.
आनंदाच्या वृद्धीसाठी मंगल स्नान, मनोरंजक खेळ, मिष्ठान्न भोजन याबरोबरच शोभेचे दारूकाम करण्याची परंपरा प्राचीन काळी केली जायची. आज त्याचे स्वरूप उत्सवी राहिले नसून महोत्सवी झाले आहे. चंद्रज्योती, भुईचक्र, फुलबाज्या विजेच्या रोषणाईचा, झगमगाटाचा आजच्या काळात अतिरेक झाला आहे. एक सांस्कृतिक परंपरा जपायची असेल तर सौम्य फटाक्याच्या लडी आणि कमी आवाजाचे फटाके उडवून दीपावली साजरी करावी.































































