
देशात महागाई वाढू नये यासाठी पंतप्रधानांनी ज्या उपाययोजना सांगितल्या आहेत त्यात प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत थोडासा जरी बदल केला तरीदेखील आपण देशाला मदत करू शकू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केल्यानंतर विरोधी पक्षांसह सामान्य जनतेमधून टीका होत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागलेय याचा भीतीदायक दाखला देत मोदींची थट्टामस्करी करू नका हो… असे कळकळीचे आवाहन समस्त जनतेला केले आहे.
‘सध्या जगातील अनेक देशांतील परिस्थिती खराब आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन झाले असून काही देशांमध्ये पेट्रोलचे भाव 400 ते 500 रुपयांवर पोहोचले आहेत. तीन-तीन दिवस पेट्रोल मिळत नाही. या जागतिक संकटकाळात देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालावी, देशासमोर संकट निर्माण होता कामा नये यादृष्टीने पंतप्रधान काही उपाय सांगत असतील आणि विरोधक जर या उपायांची अंमलबजावणी करू शकत नसतील तर त्याची किमान थट्टामस्करी तरी करू नये. पंतप्रधानांचे बोलणे सकारात्मक पद्धतीने घ्यायला हवे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पंतप्रधानांनी जो संदेश देशवासीयांना दिला आहे त्यादृष्टीने महाराष्ट्रदेखील निश्चितपणे काम करेल आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द! चार्टर्ड विमान आणि हेलिकॉप्टरचा वापर नको, मेट्रोने प्रवास करण्याचे आदेश, वाहनांची संख्या निम्म्यावर
इंधन बचतीसाठी राज्यातील सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील अर्धी वाहने कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. मंत्री आणि अधिकाऱयांनी कोणतेही परदेश दौरे करू नयेत आणि प्रवासासाठी मेट्रोचा वापर वाढवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दोन उच्चस्तरीय बैठका घेऊन विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तत्काळ अर्ध्यावर आणा. बाहेरच्या प्रवासातही ताफ्यात मर्यादित वाहनेच असतील याची जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची असेल.
मंत्री-अधिकारी यांनी कोणतेही परदेश दौरे करू नयेत. मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करू नये, नियमित विमानसेवेचा वापर करावा. मंत्री-अधिकाऱयांनी मेट्रो व अन्य सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठका
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात. शासकीय वाहनांचा काटेकोरपणे आढावा घ्यावा. ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज आणि फ्लेक्सवर कारवाई करावी.































































