डॉक्टरची सिद्धहस्त लेखणी

अनुराधा राजाध्यक्ष, anuradharajadhyakshya@gmail.com

डॉ. निशिकांत श्रोत्री. प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ. खऱया अर्थाने सर्जनशील. नवजातास जन्माला घालणारे हात तितक्याच सफाईने साहित्याच्या प्रांगणातही सराईतपणे फिरतात.

‘घर म्हणजे चार भिंती नव्हे, ज्या ज्या ठिकाणी माझ्या लिखाणाला प्रेरणा मिळाली ती सगळी ठिकाणं मला माझ्या घरासारखीच वाटतात… घरं म्हणतो मी त्याला..’ डॉ. निशिकांत श्रोत्री जेव्हा अशा ठिकाणांबद्दल सांगत होते, तेव्हा त्या त्या ठिकाणी असल्याचा अनुभव ते पुन्हा एकदा घेत होते असंच वाटत होतं मला… विवेकानंदांच्या आयुष्यात कन्याकुमारीच्या शिळेला आणि गौतम बुद्धांच्या आयुष्यात बोधीवृक्षाला जे स्थान आहे, ते स्थान डॉक्टरांच्या आयुष्यात समुद्राला आहे… महाबलीपुरमच्या समुद्रात ते उभे होते तेव्हा त्या सागरासारखंच त्यांच्या मनाला उधाण आलं होतं… एकापाठोपाठ एक एक कविता स्फुरत होत्या त्यांना… पण समद्रात उभं राहून ते कसे लिहू शकणार होते? म्हणून दुसरी कविता जन्माला येताना, आपली पहिली कविता विसरली जाऊ नये यासाठी ते ती तेथेच समुद्रात उभं राहून पाठ करत होते… एका पाठोपाठ एक चार कवितांचा हा जन्म झाला जो नंतर बसमध्ये बसल्यावर तिकिटाच्या मागे विराजमान झाला. डॉ. श्रोत्री त्यांचा लेखनप्रवास शब्दबद्ध करत होते आणि त्या प्रवासातली सहप्रवासी असल्यासारखा साक्षात आनंद मी घेत होते.

मी मॉन्टेसरीत असताना कविता करायचो, असं माझी लीला मावशी म्हणते. पाचवीत मी पहिली कथा लिहिली ‘कार्तिक स्वामींचे लग्न’. माझ्यावर साहित्यिक संस्कार झाले ते माझे आजोबा म्हणजे आईचे वडील विनायक मोरेश्वर भट, आई आणि लीला मावशी यांच्यामुळे. आजोबा ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक होते. सात वर्षांचा होतो मी. बांद्याला गेलो होतो. तिथे ‘ने मजसी ने…’ ही सावरकरांची कविता आजोबांनी मला शिकवली होती. शब्दांचा अर्थ, भावार्थ, कवितेचा गाभा माझ्या त्या इवल्याशा हृदयापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य आणि कौशल्य त्यांच्याकडे होतं.

पुढे मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर १८-१८ तास अभ्यास करून काही कथा आणि कविता यापेक्षा जास्त वेळ लिखाणाला द्यायला मला फुरसतच नव्हती. इंटर्नशिपसाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा माझे काव्यगुण उफळून आले. ससूनमध्ये होतो तिथेही खूप लिहिलं. डॉक्टर ज्याला एक्सटेंडेड हाऊस म्हणतात त्या समुद्रकिनारी घडलेला एक प्रसंग त्यांनी माझ्या डोळ्यांपुढे उभा केला. कुटुंबनियोजनाचं काम होतं गुहागरला. गुहागरच्या समुद्राबद्दल सगळेच सांगायचे की हा अनप्रेडिक्टेबल समुद्र आहे. लोक तिथे पोहायला जातात आणि काही काही वेळा काही जण परतच येत नाहीत. आम्ही सगळे त्या रात्री गप्पा मारत बसलो होतो समुद्रावर. त्या वातावरणाचा एक विलक्षण परिणाम माझ्यावर होत होता. एके क्षणी माझ्यात अशी तीव्र भावना निर्माण झाली की उठावं आणि सरळ समुद्रात चालत जावं. मी तसा उठून उभासुद्धा राहिलो ट्रान्समध्ये. तेवढय़ात गायनाकॉलॉजिस्ट उमराणीकर म्हणाले, ‘अरे या निशिकांतचं काही खरं नाही. वेगळाच दिसतोय हा. याला कविता सुचते आहे वाटतं. या शब्दांनी मी भानावर येऊन थांबलो खरा, पण नंतरचे आठ दिवस आणि रात्री मी अस्वस्थ होतो.’ आठव्या दिवशी पहाटे चार वाजता मी कविता लिहिली, ‘अशीच धुंद रात्र ही, धुंद चांदणे पडे, विसावलो तुझ्या मिठीत, मी मला न सापडे’ हे गीत गजानन वाटवे यांनी संगीतबद्ध केलं.

वि. म. कुलकर्णींनी मला एकदा सुचवलं की माझ्या कवितांचा मी कादंबरीत का नाही वापर करत? आणि मग तोही प्रयोग मी केला जो यशस्वी झाला. ज्या कादंबरीनं डॉक्टरांना साहित्यक्षेत्रात खूप उंचीवर नेऊन ठेवलं ती त्यांची कादंबरी म्हणजे ‘सिद्धयोगी’. तिची जन्मकथा सांगताना डॉक्टर म्हणाले, लामा लोबसंग राम्पा. या लामांचं ‘द थर्ड आय’ हे पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं. त्यावेळी प्रकाशक खाडिलकरांशी बोलताना मी म्हणालो की, यावर मला काहीतरी लिहावं असं वाटतंय. पहिलं अक्षर मी लिहिण्याआधीच त्यांनी ती कादंबरी छापण्याचं वचन दिलं. मग लामा लोबसंग राम्पा यांची सगळीच पुस्तकं मी वाचली. बखरींसारखा त्याचा वापर केला. त्यांचा तिबेटियन धर्मग्रंथ ‘बार्डो थोडॉल’ही वाचला. तरीही माझं समाधान झालं नाही. मी लिहिण्यासाठी सिद्ध झालो असं मला वाटलं नाही. म्हणून दार्जिलिंगला तिबेटियन लोकांमध्ये जाऊन राहिलो. दीड वर्ष अभ्यास करून मग मात्र अडीच महिन्यात ही कादंबरी मी पूर्ण केली, जी चार महिन्यांत आऊट ऑफ प्रिंट झाली.

खूप आवृत्त्या निघाल्या ‘सिद्धयोगी’च्या. हिंदुस्थानातूनच नव्हे तर देशाबाहेरूनही खूप प्रतिसाद मिळाला कादंबरीला. आजवर डॉ. श्रोत्री यांची ५० पुस्तके प्रकाशित झाली असली तरी त्यांचा सर्वात जास्त चाहतावर्ग ‘सिद्धयोगी’ कादंबरीचा आहे. आप्पासाहेब पंत तिबेटमध्ये हिंदुस्थानचे राजदूत होते. त्यांनी ‘सिद्धयोगी’ कादंबरी वाचून ‘पद्मसंभव’ आणि ‘मिलारेपा’वर लिहायला डॉक्टरांना सुचवलं. डॉक्टर म्हणाले, ‘मिलारेपा’चा अभ्यास करताना मला ज्ञानेश्वरांची आठवण झाली. त्या सगळ्याचा अभ्यास करून मी कादंबरी लिहिली. ‘पद्मसंभव’बद्दल तर काहीच संदर्भ मिळेना. ब्रिटानिया एन्सायक्लोपीडियामध्ये एका कॉलममध्ये फक्त सहा ओळी मिळाल्या. त्याचे क्रॉस रेफरन्सेस लावत लावत ४५० पानी कादंबरी मी लिहिली. ज्येष्ठ टीकाकार रा. शं वाळिंबे यांच्या प्रस्तावनेसाठी मी ते बाड घेऊन गेलो. त्यांनी प्रस्तावना दिली, पण ती लिहिताना त्यांनी मला अनेकदा फोन केले. प्रश्न विचारून ते माझी परीक्षाच घेत होते. त्यातला एक प्रश्न मला चांगलाच आठवतो… कपाळावर भ्रूमध्यावर शस्त्रक्रिया करून आज्ञाचक्र कार्यान्वित करता येतं असा कादंबरीत उल्लेख होता. वाळिंबेंनी विचारलं, असं खरंच करता येतं? त्यावर मग मी त्यांना विचारलं, तुम्हाला खेचरी मुद्रा माहिती आहे? मग मात्र त्यांना माझ्या सखोल ज्ञानाची खात्री पटली असावी. कारण त्यानंतर त्यांनी मला कुठलेही प्रश्न विचारले नाहीत. त्यांनी लिहिलेली प्रस्तावना म्हणजे माझा आणि माझ्या लिखाणाचा सत्कारच आहे असं मला वाटतं.’

७३ वर्षांचे डॉक्टर, माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारता मारता पुन्हा एकदा आपल्या आयुष्याची समुद्राशी सांगड घालत म्हणाले, या आयुष्यात मी समुद्रात डुंबावं तसा डुंबलो. प्रसंगाच्या लाटा अंगावर घेतल्या. कधी त्यांनी मला फेकलं, कधी झेललं, कधी कधी मी त्यांच्यावर स्वार झालो, कधी कधी अनुभवानं नखशिखांत भिजलो. लिहिण्याव्यतिरिक्त कुठलंही व्यसन नसणारे, पेशंटची प्रसूती करत असतानाही कवितांचा प्रसव अनुभवणारे, त्यावेळी स्फुरलेली कविता कागदावर उतरवणं शक्य नसल्यानं ती पाठ करून, डिलिव्हरी नोट लिहिण्याआधी कविता उतरवणारे, फाऊंटन पेननं लिहिलेली कादंबरी, पावसात भिजल्यावर ‘तुमच्या कादंबरीशिवाय दिवाळी अंक निघणार नाही’ अशी प्रकाशकाची मायेची धमकी मिळताच त्या कादंबरीचं पुनर्लेखन करणारे आणि एवढं सगळं करतानाही प्रसूतीतज्ञ म्हणून असलेली व्यावसायिक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे डॉ. निशिकांत श्रोत्री… ‘वेळच मिळत नाही हो’, ‘माझा व्यवसाय असा आहे की व्यवसायामुळे माझ्यातल्या कलागुणांना मला तिलांजली द्यावी लागली हो… वगैरे वगैरे कारणं देणाऱयांना आपल्या कर्तृत्वानं ठाम उत्तर देणारे आणि आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करणारे डॉक्टर निशिकांत श्रोत्री…!