
राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळी येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. नेमकी कोणत्या वादातून आत्महत्या केली हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी वरळी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. गौरी या केईएम रुग्णालयातील दंत विभागात डॉक्टर म्हणून कामाला होत्या. अनंत यांच्याशी फेब्रुवारी महिन्यात त्यांचे लग्न झाले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. गौरी आणि अनंत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. नेमका कोणता वाद होता हे स्पष्ट झालेले नाही.
डॉ. गौरी यांनी शनिवारी वरळी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गर्जे यांच्या लक्षात आला. त्यानंतर अनंत हे घरी आले. त्यांनी गौरीला खाली उतरवून नायर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याची माहिती समजताच डॉ. गौरी याच्या कुटुंबीयांनी वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी योग्य तपास करावा – पंकजा मुंडे
या घटनेनंतर अनंतचा मला फोन आला होता. तो खूप रडत होता. जे घडले ते फारच धक्कादायक आहे. पोलिसांनी कारवाईत कसूर ठेवू नये. योग्य तपास करावा, अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.



























































