मुद्दा – स्मार्ट की प्रदूषित सिटी?

1853

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

केंद्र सरकारने राज्यात ज्या ‘स्मार्ट सिटी’ची निवड केली त्यात डोंबिवली शहराची निवड करण्यात आली होती. डोंबिवलीकरांची छातीसुद्धा अभिमानाने फुलली होती. घोषणा होऊन काही काळ लोटला तरी त्याबाबत कोणात्याही प्रकारचे नियोजन अथवा सोयी होताना दिसत नाही. रस्ते, उघडे नाले, अनधिकृत बांधकामे, फेज-2 मधील असलेले अनेक छोटे मोठे रंगांचे रासायनिक कारखाने, त्यातून सोडला जाणारा वायू, त्यात असलेले कार्बनचे प्रमाण तर अगदी पहाटेच्या कारखान्यातून सोडला जाणारा वायू, त्यामधून सल्फरसारखा सुटणारा दर्प त्यामुळे श्वसनाच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे. डोंबिवलीत कधी हिरवा पाऊस पडतो. नाल्यात सोडले जाणारे रासायनिकयुक्त पाणी त्यामुळे त्याचा रंगसुद्धा हिरवा. आता परवा एमआयडीसी परिसरात रस्त्यावर सर्वत्र गुलाबी पावडर पडल्याने गुलाबी रस्ता तयार झाला होता. हा एका खासगी कंपनीत वापरला जाणारा कच्चा माल होता आणि तो घातक नाही असे जरी प्रदूषण मंडळाने स्पष्ट केले असले तरी काही रासायनिक पदार्थांचे परिणाम आपल्याला कालांतराने कळू लागतात. हवेतील वायुप्रदूषणाचे आरोग्यावर कालांतरानेच परिणाम होत असतात. या शहराबाबत विचार करावयाचा झाला तर येथील रस्ते, उघडे नाले, सांड़पाणी प्रक्रिया, प्रदूषणाबाबतीत आवश्यक त्या तरतुदी, उपाययोजना या सर्वच बाबींबद्दल समन्वय व एकवाक्यता नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचासुद्धा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. येथील रहिवासी नागरिक जागृत असून सातत्याने प्रदूषणासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर पाठपुरावा करत असतात. तरीसुद्धा दिवसेंदिवस या शहराच्या समस्या वाढत चालल्या आहेत. कितीही तक्रारी वेळोवेळी निदर्शनास आणून देऊनसुद्धा योग्य व आवश्यक ती पावले उचलली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच या शहरात कधी हिरवा पाऊस, तर कधी हिरवे पाणी, तर कधी गुलाबी रस्ता यामुळेच येथील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला तो म्हणजे ‘स्मार्ट की रंगीत प्रदूषित सिटी’? स्मार्ट नसले तरी चालेल किमान स्वच्छ, सुंदर प्रदूषणविरहित शहर असावे एवढीच माफक अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या