
रात्री-अपरात्री पंप लावून मोठागाव खाडीत वाळूचा बेकायदा उपसा करणाऱ्या वाळूमाफियांना तहसील कार्यालयाने जोरदार दणका दिला आहे. तहसील कार्यालयाने या वाळूउपसा अड्ड्यावर धाड टाकून दोन बार्ज आणि एक सक्शन पंपाचे कटरच्या सहाय्याने तुकडे केले. या कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
मोठागाव खाडीपात्रात वाळूचा बेकायदा उपसा केला जात आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार तहसील दार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हे पथक कारवाईसाठी मोठागाव खाडीपात्रात गेले तेव्हा सक्शन पंपाच्या सहाय्याने वाळूउपसाचे काम सुरू होते. कारवाईची कुणकुण लागताच वाळूमाफियांनी पाण्यात उड्या मारून पळ काढला. खाडीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करणारे बार्ज आणि सक्शन पंप ताब्यात घेण्यात आले.
३४ लाखांची साधनसामग्री नष्ट
दोन बार्ज आणि एका सक्शन पंपाचे गॅस कटरने तोडून नष्ट करण्यात आले. या कारवाईत सुमारे ३४ लाख रुपये किमतीची साधनसामग्री नष्ट करण्यात आल्याची माहिती कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. ही कारवाईमध्ये कल्याण निवासी नायब तहसीलदार, अपर कल्याण मंडळ अधिकारी आणि शिपाई कोतवाल यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.