
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील रेल्वे आणि बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय विमानेही रद्द करण्यात आली. आज देशांतर्गत विमानसेवाही थांबवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. कार्गो विमानांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून हा निर्णय अंमलात येणार आहे.
कोरोनाच्या झपाट्याने होणार्या फैलावाला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने काल देशभरातील रेल्वे तसेच बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय विमानेही रद्द करण्यात आली. मात्र देशांतर्गत विमानसेवा सुरू होती. मंगळवार मध्यरात्रीपासून ही सेवाही बंद करण्यात येणार आहे. विमान कंपन्यांना मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत आपली विमाने नियोजित स्थळी पोहचतील, असे नियोजन करावे लागणार आहे.
राज्यात आज नव्या 15 कोरोना बाधितांची नोंद झाली. आता बाधितांचा आकडा 97 वर गेला आहे. यापैकी 11 जण मुंबईतील असून पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार येथील प्रत्येकी एक जणाचा यात समावेश असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
देशात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने फैलावत आहे. 48 तासांत कोरोनाने दोन बळी घेतले असून ही संख्या 8 झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये एका 57 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून 13 मार्च रोजी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेल्या 59 वर्षीय फिलीपाईन नागरिकाचा रविवारी हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला.
केरळात आज नव्याने 26 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 96 झाली आहे. तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या 458 झाली. देशातील 25 राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला असून महाराष्ट्र, पंजाब व पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. लोकसभेचे कामकाज सुरू होताच वित्त विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले. त्यानंतर दुपारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच शहीद भगतसिंह, राजगुरू व सुखदेव तसेच सुकमातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.
























































