
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या अरुण गवळी नागपूर कारागृहात आहेत. त्याच ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण गवळीला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसत होती. यानंतर त्याची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. त्याच्यासोबत इतर चार कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
अरुण गवळी हे सध्या नागपूर कारागृहात कैद आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जेलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या सर्वच कैद्यांना स्वतंत्र जेलमध्ये ठेवून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै महिन्यात अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. त्याच्या काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करून नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे.
























































