टीव्हीवरील जाहिरातीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला, कॅनडावर लादला 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ

हिंदुस्थाननंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाकडे आपला मोर्चा वळवला आहे. टीव्हीवरील एका जाहिरातीमुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी कॅनडावर अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा शनिवारी केली. हिंदुस्थान व्यतिरिक्त कॅनडा हा एकमेव देश आहे ज्याच्यावर अतिरिक्त टॅरिफ लावण्यात आलेला आहे. याआधी अणेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केल्याचा दंड म्हणून हिंदुस्थानवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला होता.

अमेरिकेने कॅनडावर 35 टक्के टॅरिफ लादला होता. मात्र आता नव्या घोषणुळे टॅरिफ 45 टक्के झाला आहे. टॅरिफ विरोधात केलेल्या एका जाहिरातीमुळे ट्रम्प नाराज झाले होते. या जाहिरातीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे शब्द वापरण्यात आले होते. यात त्यांनी टॅरिफ प्रत्येक अमेरिकन नागरिकासाठी हानिकारक असल्याचे म्हटले होते. तसेच यामुळे व्यापार युद्ध आणि आर्थिक संकट येऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले. मात्र ट्रम्प यांनी हे चुकीचे असल्याचे म्हणत कॅनडावर अतिरिक्त टॅरिफ लादला.

कॅनडाच्या ओंटारियो राज्याने ही जाहिरात बनवली होती. ही जाहिरात शुक्रवारी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या सामन्या दरम्यान प्रसारित करण्यात आली. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. कॅनडाने ही जाहिरात तात्काळ काढायला हवी होती. पण त्यांनी तसे केले नाही. ही खोटी माहिती असलेली जाहिरात त्यांनी वर्ल्ड सीरिज दरम्यान चालवली, असे ट्रम्प म्हणाले. त्यानंतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट करत त्यांनी कॅनडावर अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लावत असल्याची घोषणा केली.

अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करण्याच्या तयारीत? कॅरेबियन समुद्रात तैनात केले हजारो सैनिक आणि 75 लढाऊ विमानं