गांधीनगर योजनेचा पाणीपुरवठा तोडल्यास कार्यालय बंद पाडणार, शिवसेनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गांधीनगर प्रादेशिक नळपाणी योजनेअंतर्गत येणाऱया ग्रामपंचायतींच्या थकबाकीसंदर्भात पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना भेटून तोडगा काढावा. मात्र, संबंधित 13 गावांचा पाणीपुरवठा तोडू नये; अन्यथा कोल्हापुरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय बंद करावे लागेल, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.

गांधीनगर प्रादेशिक नळपाणी योजनेअंतर्गत येणाऱया ग्रामपंचायतींच्या थकबाकी वसुलीसाठी पाणीपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा काढण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतींना विश्वासात घेत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा करणे आवश्यक आहे. मात्र, याऐवजी पाणीपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे संबंधित गावांचा पाणीपुरवठा खंडित करू नये यासाठी आज करवीर शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पवार, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता जे. डी. काटकर व शाखा अभियंता लोकरे यांना निवेदन देण्यात आले.

गांधीनगर, उंचगाव, गडमुडशिंगी, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरी, कणेरीवाडी, नेर्ली, तामगाव, मोरेवाडी, आर.के.नगर, पाचगाव आदी 13 गावे शहरालगत असून, या गावांची लोकसंख्या मोठी आहे. या गावांचा पाणीपुरवठा तोडल्यास अशा गावांना पाण्यासाठी कोणतीही दुसरी पर्यायी व्यवस्था नाही. यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष उफाळून येईल. जनतेबरोबर शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला.

दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱयांची एकत्रित बैठक घेऊन विचारविनिमयातून आलेला तोडगा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सादर करावा. संयुक्त शिष्टमंडळाद्वारे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडाव्यात. या मार्गाने थकबाकीचा मार्ग निघू शकतो, अशी सूचना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली.

यावेळी सुजित चव्हाण, युवासेना विस्तारक हर्षल सुर्वे, विनोद खोत, पोपट दांगट, सरदार तिप्पे, अरुण अब्दागिरी, भगवान कदम, दीपक पाटील, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख पूजा शिंदे, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, विनायक जाधव, संतोष चौगुले, दीपक रेडेकर आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.