डेक्कन क्वीन व इंटरसिटीमध्ये रंगली डबलबारी…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नाशिकमार्गे जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या पहिल्या राजधानीला डबल इंजिन लावून तिची ‘पुश ऍण्ड पुल’ चाचणी यशस्वी झाल्याने आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी सुफरफास्ट एक्प्रेस अशा दोन एक्स्प्रेसमध्ये डबल इंजिन लावण्याची स्पर्धा रंगली आहे.

सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस या मध्य रेल्वेच्या पहिल्याच राजधानीला डबल इंजिनाची ताकद लावल्याने ही गाडी आता मुंबईकरांना सोयिस्कर अशा वेळेत सोडणे शक्य झाले आहे. या गाडीच्या पुढे आणि मागे अशी दोन इंजिने लावल्याने (‘पुश ऍण्ड पुल’ तंत्रज्ञान) दुपारी 2 वाजता सुटणारी गाडी आता सायंकाळी 4.10 वाजता सीएसएमटीहून पकडणे शक्य झाले आहे आणि सकाळी 10.05 वाजता दिल्लीचे हजरत निजामुद्दीन स्थानक गाठत आहे. पश्चिम रेल्वेच्या राजधानीपेक्षा जादा अंतर असूनही हा चमत्कार केवळ डबल इंजिनामुळे घडला आहे. अशा प्रकारे डब्ल्यूएपी-7 इंजिनाच्या ताकदीमुळे उशिरा सुटूनही ही गाडी सकाळी पश्चिम रेल्वेप्रमाणे दिल्ली गाठणार असल्याने ज्यांना ऑफिसचे काम आटोपून सायंकाळी गाडीत बसायचे असेल त्यांची सोय झाली आहे. मध्य रेल्वेच्या कल्याणमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी आता मुंबई सेंट्रल टर्मिनस गाठण्याची काही गरज राहिली नसल्याचे रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

डायनिंग कारमुळे अडचण
डेक्कन क्वीनलादेखील डबल इंजिन लावण्याचा प्रयोग करून पाहिला जाणार होता, परंतु पुढे आणि मागे दोन्ही दिशांना इंजिन लावताना ‘एलएचबीचे आधुनिक डबे गरजेचे आहेत आणि डेक्कन क्वीनला चालते उपाहारगृह असल्याने अडचण आली आहे. त्यामुळे डेक्कनला अर्धा तास पुण्यास पाठवण्यात अडचण आली आहे.

मुंबई-पुणे इंटरसिटीही स्पर्धेत!
मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसला ‘पुश ऍण्ड पुल’चे डबल इंजिन लावण्याची मागणी पुणे विभागाने केली आहे. या गाडीची देखभाल पुण्याला केली जात असून तिला एलएचबीचे डबे आहेत.