गब्बर माणसांना धनाची हाव नसते हे कोणी सांगितले?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गब्बर माणसांना धनाची हाव नसते, असे कोणी सांगितले असा सवाल करत दिल्लीच्या सत्र न्यायालयाने हुंडय़ासाठी झालेल्या छळाला कंटाळून २३ वर्षांच्या विवाहितेने केलेल्या आत्महत्येबद्दल तिचा नवरा आणि कुटुंबीयांना दोषी ठरवले.

आमचे कुटुंब हे मुलाच्या पत्नीच्या कुटुंबापेक्षा अधिक श्रीमंत आहे. त्यामुळे हुंडा मागण्याची आम्हाला गरजच नव्हती, असा दावा या प्रकरणात मुलाच्या कुटुंबीयांनी केला. पण अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनेना शर्मा यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला.

मयत विवाहितेने लग्नावेळीच नवरा आणि सासरच्या लोकांसाठी ऑप्ट्रा कार माहेरहून आणली होती. पण त्यानंतरही आरोपी नवऱ्याच्या कुटुंबीयांनी ‘स्कोडा’ खरेदी केली, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

मुलाच्या पत्नीने आणलेल्या ऑप्ट्रा कारवर तिच्या सासरचे लोक समाधानी नव्हते, हे या प्रकरणात स्पष्ट होते. ऑप्ट्रा कारपेक्षा महागडी स्कोडा गाडी आणण्यासाठी त्यांनी सुनेला छळले. तिच्या आई-वडिलांनी स्कोडा गाडी देण्याची मागणी न पुरवल्यामुळे नवऱ्याच्या  कुटुंबीयांनी स्वतःच मग सेकंड हॅण्ड स्कोडा गाडी खरेदी केली, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. हुंडय़ासाठी झालेला छळ असह्य झाल्याने त्या विवाहितेने २००७ सालात सिलिंग फॅनला गळफास लावून घेत आत्महत्या केली होती.

न्यायमूर्ती सुनेना शर्मा काय म्हणाल्या?

आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या शरीरावर जखमा, माराच्या खाणाखुणा नाहीत म्हणून तिचा क्रूरपणे छळ झालाच नाही असे मानता येणार नाही.

आयपीसीच्या कलम ३०४ बी अनुसार, क्रौर्य म्हणजे केवळ शारीरिक छळ नव्हे तर मानसिक छळसुद्धा क्रौर्यच आहे. मानसिक छळ असह्य झाल्यामुळेही एखादी व्यक्ती टोकाचे पाऊल उचलू शकते.