बाबांचं उपोषण अन् उद्धव ठाकरे यांची विनंती

Dr. Baba Adhav Ends Anti-EVM Protest After Uddhav Thackeray's Request

डॉ. बाबा आढाव आणि आंदोलन हे जणू एक समीकरणच होतं. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य समर्पित केलं. कष्टकरी असोत की रिक्षावाले, निम्म्या रात्रीलाही बाबा त्यांच्या हाकेला धावून जायचे. उपेक्षितांचे अंतरंग जाणणाऱ्या बाबांचे कार्य केवळ या घटकांपुरतेच मर्यादित राहिले नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बाबांनी पुण्यात ईव्हीएम घोटाळ्याविरोधात उपोषण आंदोलन केले. हे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना केली. या विनंतीचा मान राखत बाबांनी उपोषण आंदोलन मागे घेतले होते.

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने पैशांचा केलेला वारेमाप वापर आणि ईव्हीएम घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलन छेडले होते. सरकारच्या या कृष्णकृत्याने व्यथित झालेल्या बाबांनी पुण्यात ‘आत्मक्लेष’ उपोषण आंदोलन केले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. लोकशाहीच्या रक्षणासाठी मैदानात उरतलेल्या बाबांना उद्धव ठाकरे यांनी ‘हे आंदोलन आम्ही पुढे चालवू,’ असे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीचा मान राखत बाबांनी तिसऱ्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही उपोषणस्थळी बाबांची भेट घेतली होती. त्यावेळी दैनिक ‘सामना’त बाबांच्या उपोषणाची बातमी ‘लोकशाहीच्या रक्षणासाठी 95 वर्षांचा योद्धा मैदानात’ अशा मथळ्याने प्रसिद्ध करण्यात आली होती. हा मथळा शरद पवार यांनी त्यांना वाचून दाखवला होता.