
बाबांचा अखेरचा श्वास हजारो काळजांना पिटवळून गेला. त्यांच्या जाण्यानं केवळ पुणेकरच नव्हे, तर त्यांचा आवडता सोनचाफाही निःशब्द झाला; पण हा निःशब्द चाफाच आता पुन्हा उभारी घेत बहरणार आहे. आपल्या पाना-फुलांकडून तो लाडक्या बाबांच्या स्मृती गंधरुपी दरवळून त्यांच्या विचारांची पखरण करणार आहे.
मातीत या रुजेन मी पुन्हा बहरेन मी!
अंतर्मनाला अशी आश्वासक साद घालत बाबा निरंतर आपल्या सोबतच आहेत, याची अनुभूती आज बाबांच्या कुटुंबियांबरोबरच त्यांच्या चाहत्यांनी अनुभवली. निमित्त होतं, बाबांच्या अस्थी-रक्षाविसर्जन विधीचं! यावेळी हमाल भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ रक्षा आणि माती पसरवून बाबांच्या आवडत्या सोनचाफ्याच्या रोपटय़ांची लागवड करण्यात आली.
कष्टकऱयांचे नेते डॉ. बाबा आढाव यांचे सोमवारी निधन झाले. काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज वैकुंठ स्मशानभुमीतून त्यांच्या अस्थी आणि रक्षा बाबांच्या चळवळीचे केंद्र असलेल्या हमाल भवनात नेण्यात आल्या. तेथे प्रवेशद्वाराजकळच खड्ड्यात त्या पसरण्यात आल्या. त्यात बाबांच्या पत्नी शीला, मुलगे असीम आणि अंबर यांच्या हस्ते, बाबांना अत्यंत आकडत असणाऱया सोन चाफ्याचे रोप लाकण्यात आले. भेटणाऱया प्रत्येकाला बाबा सोनचाफ्याचे फुल देत असत. आता शरीराने ते नसले तरी हमाल भवन च्या दारात काढणारे हे रोपटे फुले देईल. त्याच्या सुगंधा बरोबर बाबांच्या समतेच्या विचारांची ते आठवण करून देईल.

























































