संस्कृत पंडित, मीमांसा तज्ज्ञ डॉ. दा. वि. गर्गे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संस्कृत पंडित व मीमांसा तज्ज्ञ डॉ. दामोदर विष्णू उर्फ दा. वि. गर्गे यांचे आज शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. त्यांच्यावर सायंकाळी शहरातील मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य सरकारच्या संस्कृत पंडित पुरस्कारासह अनेक सन्मान त्यांना मिळाले होते. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे यांचे ते वडील होत.

पुण्यातील स.प. महाविद्यालय आणि डेक्कन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करणारे डॉ. गर्गे यांनी १९४७ साली मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली होती. मीमांसा शास्त्रातील ‘शबर भाष्यातील अवतरणे : एक चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. १९४६ ते १९७८ या कालावधीत ते अमळनेर (जि. जळगाव) येथील प्रताप महाविद्यालयात प्राध्यापक, उपप्राचार्य आणि के.इ.एस. संस्थेचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. १९७९ ते १९८७ या कालावधीत पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात संस्कृत बृहत्कोशाच्या संपादक मंडळावर त्यांनी काम केले. १९८७ ते १९८९ या कालावधीत पुणे येथे भांडारकर संस्था व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे त्यांनी अध्यापन, संशोधन आणि मार्गदर्शन केले. १९८९ पासून संभाजीनगर येथे स्थायिक झाल्यानंतर ते अभिजात नृत्य, नाट्य, संगीत क्षेत्रातील कलाकार, ज्येष्ठ नागरिक, शालेय, महाविद्यालीन शिक्षकांना गीता, वैदिक गणित, कुंडली वाचन, अभिजात कलांचा इतिहास, वेदाभ्यास, पौरोहात्य इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करीत होते. त्यांना या कार्याबद्दल मीमांसा पुरस्कार (इचलकरंजी संस्थान), आदर्श संस्कृत शिक्षक (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे), संस्कृत पंडित पुरस्कार (महाराष्ट्र शासन, मुंबई), संस्कृत विद्वान पुरस्कार (वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे), लोकमान्य टिळक संस्कृत पुरस्कार (टि.म.वि., पुणे), संस्कृतभारती पुरस्कार (देवगिरी प्रांत), प्रदीर्घ सेवा पुरस्कार (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), पुरुषोत्तम पुरस्कार (सांगली), अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. दोन वर्षांपूर्वी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी त्यांचा शताब्दीपूर्ती सोहळा उत्साहात साजरा केला होता.