देशभर कडकडीत लॉकडाऊनचीच गरज; एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांचा सावधानतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना आताप्रमाणेच हातपाय पसरत गेला तर विषाणूची तिसरी लाट येऊ शकते. संसर्गाची ही साखळी वेळीच तोडण्यासाठी देशभर किमान दोन आठवडय़ांचा कडकडीत लॉकडाऊनच लागू करण्याची गरज आहे. संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू, विकेण्ड लॉकडाऊन काहीएक कामाचा नाही, असा सावधानतेचा इशारा राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

डॉ. गुलेरिया यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या वेळी त्यांनी देशातील कोरोनाचा कहर आटोक्यात आणण्यासाठी सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या. कोरोना आताप्रमाणेच हातपाय पसरत राहिला आणि नव्या स्ट्रेनची तीव्रता वाढली तर देशाला विषाणूच्या तिसऱया लाटेचा धोका आहे. मात्र जर आपण मोठय़ा प्रमाणावर लोकांचे लसीकरण केले तर तिसरी लाट सध्याच्या दुसऱया लाटेइतकी धोकादायक नसेल, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. काही राज्यांनी नाईट कर्फ्यू आणि विकेण्ड लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र हे उपाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपयोगी पडणारे नाही. देशात किमान दोन आठवडय़ांचा कडक लॉकडाऊनच गरजेचा आहे. रुग्णसंख्या लवकर घटली, तर लॉकडाऊन निर्धारित वेळेआधीही उठवला जाऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

ब्रिटनसारखा लॉकडाऊन लागू करावा लागेल

देशात ब्रिटनसारखा लॉकडाऊन करावा लागेल. मग तो राज्यांच्या पातळीवर असू द्या किंवा राष्ट्रीय पातळीवर. हा निर्णय धोरणकर्त्यांचा असेल. कारण लोकांचे जीवन, उदरनिर्वाह अशा सर्व बाबींचा विचार करून ठरवावे लागेल. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्या लागतील, दररोज मजुरी करून पोट भरणाऱयांचाही विचार करावा लागेल. परंतु, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन कडकच असायला हवा, असा पुनरुच्चार डॉ. गुलेरिया यांनी केला.

उपायांची त्रिसूत्री

  • देशभरातील रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली पाहिजे.
  • ठोस पावले उचलून कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणली पाहिजे.
  • कोरोना लसीकरण मोहिमेला गती दिली पाहिजे. जर आपण लोकांचा संपर्क टाळू शकलो, तर कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ शकते.