देखणे न देखणे – माध्यम व अनुभव ः आत्मशोधाची गुंफण

>> डॉ. मिनाक्षी पाटील 

कलाक्षेत्रात कलावंताची आपापल्या माध्यमाची जाण विकसित होत जाताना कधी तो त्या कलेची एक व्याकरणबद्ध चौकट अनुसरण्याचा प्रयत्न करताना दिसतो तर कधी नवीन सौंदर्यसर्जन करण्याचाही प्रयत्न करीत असता. कलावंताचा हा प्रवास जसा नवसर्जनाचा तसाच आत्मशोधाचाही असता. यातून मिळणारी भावसमृद्धी ही कलानुभवात फार महत्त्वाची भूमिका बजावते.

समग्र मानवी उक्रांतीच्या प्रवासाचा विचार केला तर साऱया कलांचा ‘कला’ म्हणून विचार तसा अगदी अलीकडील कालखंडात सुरू झाला असे म्हणता येईल. प्रत्येक कलेची स्वतची अशी एक आविष्काराची स्वतंत्र चिन्ह व्यवस्था असते, भाषा असते आणि त्यानुसार कलानिर्मिती आकार घेताना दिसते. कोणत्याही कलेत कलाकृती निर्माण करणारा कलाकार आणि त्या कलाकृतीचा आस्वाद घेणारा आस्वादक अशा दोन व्यक्तींच्या मनोविश्वात कलाव्यवहार साकारात असतो. आपण मागील लेखात पाहिले की, सर्वसामान्य व्यक्ती आणि कलावंत दोघेही एकाच वास्तवात जगत असले तरी जगाकडे पाहण्याच्या त्यांच्या संवेदनशील दृष्टिकोनातच मूलभूत फरक असतो. वास्तव जगात जरी निसर्गाचे नियम व्यक्तिनिरपेक्षपणे चालत असले तरी कलावंताने आपल्या प्रतिभेने निर्माण केलेल्या कल्पित विश्वातील नियम मात्र त्याने ठरविलेले असतात.

प्रत्येक कलेद्वारे प्रातिभ निर्मिती होत असली तरी कालौघात प्रत्येक कलेच्या रचनातत्त्वांचे स्वतंत्र असे व्याकरण तयार झाले व त्या त्या कलांची माध्यमे, त्यांची द्रव्ये निश्चित होत गेली. या विविध कलांची माध्यमद्रव्ये म्हणून जरी माती, दगड, कागद, काही वेळा मानवी शरीर असे वैविध्यपूर्ण जड पदार्थ असले तरी त्यांतून निर्माण होणारा कलानुभव हा मात्र चैतन्यमय असतो. विविध माध्यमद्रव्यांच्या सहाय्याने कलावंत कलाकृती घडवतो, रचना सादर करतो आणि त्याची विविधांगी प्रतिती आपल्याला ऐकणे, पाहणे अशी केंद्रिय स्तरावर होत असते. अर्थात या केंद्रिय अनुभवाच्याही पल्याड जाण्याचा प्रयत्न कलावंत कायमच करीत असतात.

त्यांच्या या शोधप्रक्रियेत बऱयाचदा कलाकृतीचा अमूर्ताकडे प्रवास सुरू होतो. या अर्थाने पाहिल्यास कलानुभवाचा कलानिर्मितीच्या अंगाने व कलास्वादाच्या अंगाने असा दुहेरी विचार करावा लागतो. जगताना तीव्रतेने जे काही जाणवलेले असते ते विविध माध्यमाद्वारे व्यक्त करताना कलावंत जो नवनिर्मितीचा अनुभव घेत असतो, तो निर्मितीच्या अंगाने व कलावंताच्या त्या निर्मितीचा रसिकांकडून जो आस्वाद घेतला जातो तो आस्वादाच्या अंगाने, असा दोन्ही अर्थाने कलानुभवच असतो. अर्थात कलावंताला प्रत्येक वेळी त्याची निर्मितीप्रक्रिया शब्दांच्या सहाय्याने व्यक्त करता येईलच असे नाही, तर काही वेळा त्याच्या कलाकृतीतून तो शब्दांच्याही पलीकडचं असं काहीतरी अमूर्त व्यक्त करीत असतो.

कलावंताचं आणि आस्वादकाचं अनुभवविश्व जितकं समृद्ध तितकं ते कलानिर्मितीला आणि कलास्वादाला पूरक ठरतं. कलाकृतीतील अनेकार्थता समजून घ्यायला या वैविध्यपूर्णतेने संपन्न झालेल्या अनुभवविश्वाचा आस्वादकाला जसा उपयोग होतो, अगदी त्याचप्रकारे समृद्ध अनुभवविश्वामुळे कलावंताला नवनिर्मिती करताना आपल्या कलाकृतीतून अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण करता येतात. अशारीतीने समृद्ध अनुभवविश्व कलावंताला नवनिर्मितीच्या अनेक शक्यतांकडे आणि कला आस्वादकाला कलानंदाकडे नेत असते. काही कला या एकटय़ाने अनुभवायच्या असतात तर काही कलांचा आस्वाद समुहाने घेता येतो. लिखित साहित्य, चित्र, शिल्प यासारख्या कला या एकल आस्वादाच्या कला आहेत तर नाटक, नृत्य, संगीत यासारख्या सादरीकरणाच्या कलांचा आस्वाद सामूहिक पद्धतीने घेतला जातो. अर्थात आजच्या काळात विविध कलांचे फ्यूजन करण्याचेही प्रयोग सध्या होताना दिसतात. अशा प्रयोगांमध्ये आपापल्या अनुभवज्ञानांनुसार जो तो आपापल्या परीने आस्वाद घेत असतो. एकटय़ाने आस्वाद घेता येणाऱ्या कलांमध्ये आणि समूहाने अनुभव घेता येणाऱ्या प्रयोगात्म कलांमध्ये कलानुभवाचे संदर्भ फार वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात.

माणसाच्या जैविक उक्रांतीच्या प्रवासात त्याला ज्या विविध क्षमता प्राप्त झाल्या, त्यात विविध गोष्टींचा अनुभव घेऊन त्या अनुभवांना आपापल्या परीने व्यक्त करणे ही एक महत्त्वाची क्षमता मानवाला प्राप्त झाली आहे. या अनुभव घेण्याच्या आणि व्यक्त करण्याच्या क्षमतेमुळेच माणसाचं जगणं भावसमृद्ध झालंय. कलाप्रांतात तर कलानिर्मितीचा आनंद आणि त्या निर्मितीचा आस्वाद यातून मिळणारी भावसमृद्धी ही कलानुभवात फार महत्त्वाची भूमिका बजावते. या भावसमृद्धीसाठी तर जाणीवपूर्वक अभ्यासाचे अनन्यसाधारण महत्त्व मानले गेले आहे. वेगवेगळ्या कलांच्या माध्यमांची जाण ही कलेच्या निर्मिती प्रक्रियेत जितकी महत्त्वाची असते तितकीच आस्वाद प्रक्रियेतही महत्त्वाची ठरते. कलावंत आणि आस्वादक यांच्यातील संवादाला, भावाभिव्यक्तीला ती पूरक ठरते.

कोणत्याही कलाक्षेत्रात कलावंताची आपापल्या माध्यमाची जाण विकसित होत जाणं, तंत्रावर हुकूमत गवसत जाणं हे त्याच्या कलाप्रवासाला नवनवे आयाम मिळण्यासाठी फार आवश्यक असतं. या प्रवासात कलावंत कधी त्या त्या कलेची एक व्याकरणबद्ध चौकट अनुसरण्याचा प्रयत्न करताना दिसतो तर कधी त्या चौकटीला लवचिक करत, प्रसंगी कधी तिची तोडमोड करत काही नवीनच सौंदर्यसर्जन करण्याचाही प्रयत्न करीत असता. हे करताना कलावंत कधी दृश्य स्तरावर घाट आणि आशयाच्या मांडणीचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो तर कधी अदृश्य स्तरावर घाट आणि आशयाची चौकट मोडण्याचाही प्रयत्न करीत असतो. यादृष्टीने पाहिल्यास एकाच वेळी कलावंताचा हा प्रयत्न जसा नवसर्जनाचा असतो तसाच तो आत्मशोधाचाही असतो, असे म्हणता येईल.
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या
सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)
[email protected]