
संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे आज सकाळी 10 वाजता सोलापूर येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत रविवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले.
प्राध्यापक नरेंद्र सदाशिव कुंटे यांचा जन्म 23 डिसेंबर 1945 रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे झाला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी अक्कलकोट येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. निंबाळ येथील प.पू. गुरुदेव रानडे परिवारातील ते अनुग्रहित साधक होते. गेली 40 वर्षे ते महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांतून संतसाहित्यावर लेखन करीत असत. दैनिक ‘संचार’, दैनिक ‘समाचार’मध्ये तरुण वयात त्यांनी काही काळ नोकरी केली होती.
संतसाहित्य, संतचरित्रे यावर त्यांनी विविध दैनिकांतून विपुल लेखन केले आहे. ‘नाथ भागवतातील भक्ती वर्म’, ‘समर्थांचे शिक्षणशास्त्र सायंदेव रक्षिले श्री गुरूंनी’, ‘स्वामी वंदन स्वामी पाठातील भक्ती धर्म, बारा ओव्या शतकेमधील समर्थ बोध’, ‘बुद्धी दे विनायका’, ‘ज्ञानेश्वरीतील भक्तिसंवाद’, ‘गुरुलीलामृत’ ग्रंथातील ‘स्वामी प्रबोध’सारखे त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले असून इतर अनेक ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र कुंटे यांना सज्जनगड संस्थानचा श्री समर्थ रामदास पुरस्कार, श्रीपाद सेवा मंडळ, पुणे यांचा मामासाहेब देशपांडे स्मृती उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, सनातन धर्म संस्थेचा देवर्षी नारद पुरस्कार, संतसाहित्य सेवेबद्दल डॉक्टर कानडे पुरस्कार, संतसाहित्य सेवा संघातर्फे त्यांचा पुरुषोत्तम सेवा असे विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. तसेच अन्य मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.






























































