
संरक्षणविषयक अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याप्रकरणी ‘एटीएस’ने अटक केलेले ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना उद्यापर्यंत एटीएस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पुण्यातील विशेष न्यायालयात त्यांना आज हजर करण्यात आले होते.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)काही दिवसांपूर्वी डॉ. कुरुलकर यांना अटक केली होती. डॉ. कुरुलकर ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले आणि संरक्षणविषयक संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज डॉ. कुरुलकर यांना पुन्हा विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते.
‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर हे ई-मेलद्वारे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते. तसेच पाकिस्तानमधून आलेल्या ई-मेलला ते रिस्पॉन्सही देत होते. त्यांनी संरक्षणविषयक काही फोटो शेअर केल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासात उघडकीस आली आहे.
डीआरडीओच्या गेस्टहाऊसमध्ये महिलांना भेटत होते
याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विजय फरगडे यांनी युक्तिवाद केला. डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानात नेमके कोणाला मेल पाठवले? त्यांच्यात काय संभाषण झाले? सहा देशांमध्ये गेले असता, शासकीय कामांव्यतिरिक्त आणखी कोणाला भेटले का? डॉ. कुरुलकर हे ‘डीआरडीओ’च्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना भेटत होते. त्याबाबत सखोल तपास करण्यासाठी, तसेच त्यांच्या बँक स्टेटमेंटमधील नोंदींची चौकशी करण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अॅड. फरगडे यांनी केली.
मोबाईल, लॅपटॉपमधील काही डेटा केला डिलीट
डॉ. कुरुलकर यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट मंगळवारी न्यायालयात दाखल करण्यात आला. या डिव्हाइसमधील काही डेटा त्यांनी डिलीट केल्याचे रिमांड रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा डिलिट केलेला डेटा काय होता याचा तपास एटीएस करणार आहे.
































































