अयोध्या – प्राचीन स्मार्ट सिटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. समिरा गुजर जोशी

‘गीतरामायणा’ची रचना ही ‘वाल्मीकी रामायणा’ला आधारभूत मानून झाली आहे. त्यामुळे ‘वाल्मीकी रामायणा’तले अनेक प्रसंग मांडताना आपोआप ‘गीतरामायणा’तल्या गीताचे बोल मनाच्या रेडिओवर पार्श्वसंगीतासारखे वाजू लागतात. ‘वाल्मीकी रामायणा’तही लवकुश रामापुढे रामकथा गात आहेत. कथेचा नायकच कथेचा श्रोता आहे आणि कथा सांगत आहेत त्याचेच पुत्र, पण त्यांना कुणालाच या विचित्र दैवयोगाची कल्पना नाही, असा हा अद्भुत प्रसंग. ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती’ हे गीत या प्रसंगासंदर्भात आपल्याला आपसूक आठवते, पण आजच्या लेखाचा विषय हा नाही, तर आजच्या लेखाचा विषय आहे अयोध्या नगरी. लव-कुशांनीसुद्धा आपल्या कथनाची सुरुवात केली ती या अयोध्या नगरीच्या वर्णनापासून. अयोध्या म्हटली की, ‘सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी’ हे गीत मनात जागे होतेच. ते हा लेख वाचत असताना आपल्याला आठवत राहील यात काही शंका नाही.

आजच्या काळात आपण सगळे ‘स्मार्ट सिटी’ या संकल्पनेच्या प्रेमात आहोत. आपल्याला व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणूनही स्मार्ट सिटीमध्ये राहायचे आहे, पण स्मार्ट सिटी म्हणजे नेमके काय? आज आपण ‘स्मार्ट’ची कल्पना बहुतांशी टेक्नॉलॉजीच्या वापराशी जोडली आहे, पण मुळात स्मार्ट आणि समर्थ यामध्ये ध्वनीदृष्टय़ा आणि अर्थदृष्टय़ाही फार साधर्म्य आहे बघा… `Smart’ describes to the city’s ability to create well-being for its citizens. जी प्रजेच्या कल्याणाच्या दृष्टीने सक्षम आहे, समर्थ आहे; ती स्मार्ट सिटी. अयोध्या तर फार प्राचीन काळापासून एक अत्यंत प्रगत नगरी राहिली आहे. या नगरीच्या वैभवाचे फार सुंदर वर्णन बालकांडामध्ये आले आहे. त्यावर नजर टाकली तर अयोध्या प्राचीन स्मार्ट सिटी होती का ते ठरवता येईल.

अयोध्या म्हणजे सरयू नदीच्या तीरावर वसलेली, कोसल प्रांताचा भाग असणारी, ही रघुवंशाची किंवा इक्ष्वाकू कुळाची राजधानी. ती वसवली या कुळाचा मूळ पुरूष वैवस्वत मनुने. या वंशात सगर, भगीरथ, दिलीप, रघू, अज असे कितीतरी महान राजे होऊन गेले. या राजांनी प्रसंगी देवांवरही स्वारी केली. त्यांच्याशी युद्ध करून या नगरीला जिंकणे कोणालाही शक्य नव्हते म्हणून या नगरीला ‘अयोध्या’ हे नाव पडले. वाल्मीकींनी आपल्याला या नगरीचा तेव्हाच विस्तार किती होता हेही सांगितले आहे.

आयता दश च द्वे योजनानि महापुरी ।

श्रीमती त्रिणी विस्तीर्णा सुविभक्तमहापथा ।।  

ही विशाल नगरी बारा योजने लांब आणि तीन योजने रुंद आहे. एक योजन म्हणजे सहसा आठ मैल म्हणजे साधारण 12.96 कि. मी. धरतात. म्हणजे अयोध्या नगरीची लांबी साधारण 155 कि. मी. आणि रुंदी 38 कि. मी. होती. म्हणजे तिचे क्षेत्रफळ अंदाजे 5890 चौ. कि. मी. होते. न्यूयॉर्क आजचे क्षेत्रफळदृष्टय़ा जगातले मोठे शहर मानले जाते. त्याचे क्षेत्रफळ 11,344 चौ. कि. मी. आहे. म्हणजे जवळ जवळ दुप्पट. अर्थात तेव्हाची लोकसंख्या आणि प्राचीन काळ हेही लक्षात घ्यायला हवे. प्राचीन हिंदुस्थानच्या समृद्धीचा विचार करताना हे असे संदर्भ निश्चितच महत्त्वाचे म्हटले पाहिजेत.

आजही कोणत्याही शहराच्या वैभवाचे वर्णन करताना आपला पहिला निकष असतो त्या शहरातले इन्फ्रास्ट्रक्चर, त्यातही शहरातले रस्ते. गंमत म्हणजे वाल्मीकीदेखील अयोध्या नगरीचे वर्णन करताना सगळ्यात आधी तिच्या रस्त्यांचे वर्णन करतात. ती ‘सुविभक्तमहापथा’ आहे. मोठमोठय़ा रस्त्यांनी ती जोडली गेली आहे. हे राजमार्ग इतके सुंदर आहेत की, ते रोज नुसते झाडून पुसून स्वच्छ केले जातात असे नव्हे, तर त्यावर फुलांची पखरण आणि सुगंधी जलाचा शिडकावा होतो… आणि हे सारे केवळ सणाला किंवा स्पेशल व्हिजिटच्या वेळी नव्हे, तर रोज केले जाते. या ठिकाणी सहजरीत्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे प्रसिद्ध उद्गार आठवतात. “American roads are not good because America is rich, but America is rich because American roads are good.’’ रस्ते हे प्रगतीची जीवनवाहिनी असतात, पण त्या काळात रस्त्यांकडे इतके लक्ष दिले जात होते ही बाब निश्चितच लक्षणीय आहे. असाच आणखी एक थक्क करणारा उल्लेख येतो की, इंद्राने अमरावती वसवली त्याप्रमाणे दशरथ राजाने इथली लोकसंख्या पूर्वीपेक्षा अधिक वाढवली. म्हणजेच ज्याला आपण आज टाऊन प्लॅनिंग म्हणतो त्याप्रमाणे काही योजना तेव्हा राबवल्या जात असणार. नवीन वसाहती निर्माण करून त्यामध्ये लोकांना वसवले जात असणार. नगरीचे वर्णन पहा कसे केले आहे – या नगरीला सर्व बाजूंनी वेशी आणि कमानी आहेत. नियमित अंतरावर उत्तम बाजारपेठा आहेत. विविध क्षेत्रांतले कारागीर इथे राहतात. मनोरंजनासाठी नाटकशाळा आहेत, ठिकठिकाणी बागा आहेत, आमराया आहेत. या नगरीमध्ये उंच उंच इमारती आहेत, ज्यावर ध्वज फडकत आहेत. स्वरक्षणासाठी नगरीमध्ये अनेक प्रकारची यंत्रे आणि आयुधे आहेत. याच ठिकाणी ‘शतघ्नीशतसंकुला’ असा उल्लेख येतो. ज्यावरून अयोध्या नगरीत शंभर तोफा होत्या असे सांगण्यात आले आहे. दळणवळण, व्यापार, मनोरंजन, राहणीमान, सुरक्षितता अशा विविध मुद्दय़ांना या वर्णनातून स्पर्श केलेला दिसतो. तरी एक महत्त्वाचा मुद्दा अजून बाकी आहे, तो म्हणजे इथले पौरजन अर्थात नागरिक. त्यांच्याविषयी पुढील लेखात जाणून घेऊ, पण या काही श्लोकांवरूनसुद्धा आपण प्राचीन हिंदुस्थानच्या वैभवाची आणि आपल्या प्राचीन स्मार्ट सिटीची कल्पना करू शकतो. तुमचे काय मत आहे मला जरूर कळवा.

[email protected]

(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङ्मयाची अभ्यासक)