
सामना ऑनलाईन । सटाणा
बागलाण तालुक्यातील प्रलंबित शेतीसिंचनाच्या योजना, पिण्याचे पाणी, आरोग्य, रस्ते यासारख्या समस्यांची गत पाच वर्षांत सोडवणूक केली. निवडणुकीत दिलेला प्रत्येक शब्द आपण खरा केलेला आहे. आगामी काळात विकासाचा अनुशेष भरून काढीत असताना केंद्रात मोदी सरकार पुन्हा आणण्यासाठी शिवसेना-भाजप युतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन धुळे लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. येथील सूर्या लॉन्स येथे आयोजित शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप व मित्रपक्षांच्या महामेळाव्यात डॉ. सुभाष भामरे संबोधित करीत होते. महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रतापदादा सोनवणे होते.
व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, सुरेश निकम, बंडूकाका बच्छाव, नगराध्यक्ष सुनील मोरे, मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव, शिवसेनेचे लालचंद सोनवणे, अरविंद सोनवणे, रिपाइंचे किशोर सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष संजय भामरे, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, साहेबराव सोनवणे, जि. प. सदस्या लता बच्छाव, मीना मोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
बागलाणवासीयांना दिलेला प्रत्येक शब्द खरा करण्यासाठी झटलो
गेल्या निवडणुकीत बागलाणवासीयांना दिलेला प्रत्येक शब्द खरा करण्यासाठी प्रामाणिकपणे झटलो आहोत. शेती सिंचनाच्या प्रलंबित योजनांना चालना देऊन प्रत्यक्ष साकार केल्या आहेत. सटाणा शहरासाठी 51 कोटी रुपयांची पुनद योजना मंजूर करून रस्ते, आरोग्यप्रश्नी केंद्र तसेच राज्य शासनाकडून मोठय़ा प्रमाणावर निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती धुळे मतदारसंघातील युतीचे उमेदवरा डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.



























































