
>> डॉ. वंदना बोकिल-कुलकर्णी
ज्या काळात स्त्रीला स्वतच्या भावना, स्वतचं मन उघडपणे व्यक्त करण्याची मुभा नव्हती त्या काळात स्वतच्या आयुष्याचा आलेख मांडत, रमाबाई रानडे यांनी ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे आत्मचरित्र लिहिलं. मराठीतलं हे स्त्राrलिखित पहिलं आत्मचरित्र.
विसावं शतक सुरू झालं तेच मुळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या मृत्यूची वार्ता घेऊन. 16 जानेवारी 1901. रानडय़ांच्या मृत्यूमुळे एकूणच वैचारिक समन्वयाची मांडणी करणाऱया क्षेत्राची अपरिमित हानी झाली आणि वैयक्तिक स्वरुपाची हानी झाली ती रमाबाई रानडे यांची. ‘उंच माझा झोका’सारख्या मालिकेतून महाराष्ट्राला रमाबाई आणि रानडे यांच्या सहजीवनाची थोडीतरी ओळख झाली. नाहीतर रमाबाई कोण? पंडिता? इतकीच माहिती सामान्य लोकांना होती. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे या दोन वेगळ्या व्यक्ती होत्या, हेही अनेकदा माहीत असत नाही.
रानडे गेल्यावर 9 वर्षांनी रमाबाईंनी ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे आत्मचरित्र लिहिलं. मराठीतलं हे स्त्रीलिखित पहिलं आत्मचरित्र! विशेष म्हणजे हे लिहिण्यासाठी कारणभूत ठरली तीही एक स्त्रीच. रमाबाईंच्या दुःखावर उतारा म्हणून त्यांनी आठवणी लिहून काढाव्यात अशी सूचना त्यांच्या मानलेल्या मुलीने – सौ. सखुताई विद्वांस यांनी केली. रमाबाईंनी ती मानली आणि हे पुस्तक लिहिलं. त्यांनी हे पुस्तक तिलाच अर्पण केलं आहे. आई-लेकीच्या नात्यातला हा लेखन-बंध फार मोलाचा वाटतो.
रमाबाईंच्या आणि रानडय़ांच्या वयात बरेच अंतर होते. लहानग्या पत्नीला रानडय़ांनी शिक्षण दिलं, तिच्या इंग्रजी शिक्षणाची सोय केली आणि रमाबाईंनी त्या काळच्या सार्वजनिक जीवनात सहभागी व्हावं, असा आग्रहही धरला. मात्र घरातील वडीलधारी मंडळी जेव्हा नाराज होत, रमाबाईंच्या शिक्षणाला विरोध करीत तेव्हा मात्र रानडे रमाबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहात नसत, याचा अगदी स्पष्ट उल्लेख या आत्मचरित्रात रमाबाईंनी केला आहे. रमाबाईंच्या स्वतंत्र आणि स्पष्ट विचारांची चुणूक त्यात दिसते. त्यांचा समजूतदारपणा आणि बुद्धिमत्ताही दिसते.
माधवरावांच्यामुळे रमाबाई घडल्या हे खरे; पण त्यांच्या मृत्यूनंतर रमाबाईंनी जे कार्य केले त्याचाही पाया माधवरावांनी घातला. ‘सेवासदन’ या संस्थेची स्थापना, स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, सुरत काँग्रेसनंतर झालेल्या स्त्रियांच्या परिषदेचे त्यांनी भूषवलेले अध्यक्ष पद यांचा उल्लेख या कथनात नाही. पण अत्यंत प्रगल्भ आणि संयमी वर्तनाच्या रमाबाई या कथनातून समोर येतात.
त्या काळाच्या मर्यादा या कथनाला निश्चित आहेत. पण रमाबाईंनी काळाच्या पुढे जाऊन दाखवलेलं धैर्य, समजूत आणि व्यापक सामाजिकतेचं भान स्पष्ट दिसतं. मुद्दाम उल्लेख करायचा तो आगरकरांच्या पत्नी यशोदाबाई यांचा. आगरकर कडवे सुधारक. आपल्या पत्नीला शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र सफल झाला नाही. कारण यशोदाबाईंना शिक्षणात मुळीच रस नव्हता. रमाबाई इथे वेगळ्या ठरतात. रानडय़ांना काय अभिप्रेत आहे, हे जाणून त्यानुसार त्यांनी स्वतचा विकास घडवून आणला. यथावकाश त्यांना रानडय़ांच्या ‘संतत्वाची’ ओळखही पटली. यशोदाबाई आगरकरांनी खूप नंतर आत्मचरित्र लिहिले. त्यात त्यांनी उल्लेख केला आहे की, आगरकर त्यांना अनेकदा केशवपनाच्या क्रूर रुढीला बळी पडू नकोस असं सांगत. पण तेव्हा त्यांना त्याचा गाभ्यातील अर्थ न समजता केवळ ते अभद्र काहीतरी बोलतात, असं वाटे. मात्र यशोदाबाईंनी पतीच्या निधनानंतर घरातील ज्येष्ठांच्या आग्रहाला मान तुकवली नाही आणि केशवपनाच्या रुढीला त्या बळी पडल्या नाहीत, हेही खरे. त्या काळाचा विचार करता स्त्राrला स्वतच्या भावना, स्वतचं मन असं उघडपणे व्यक्त करण्याची मुभाच नव्हती. अशा वेळी स्वतच्या आयुष्याचा आलेख मांडणं, पतीच्या स्वभावाबद्दल, वर्तनाबद्दल काही म्हणणं हेही मोठय़ा धाडसाचं. रमाबाई घरात कोंडून न घेता सार्वजनिक कामात कार्यरत राहिल्या, हे विशेष. पतीच्या निधनानंतर स्त्रीचं आयुष्य संपल्यात जमा होई, त्या काळात आपलं दुःख आणि जनरुढी दोहोंवर मात करत त्यांनी तब्बल दोन दशकांहून अधिक काळ अर्थपूर्ण रीतीनं जगणं ही मोठी नवलाची गोष्ट आहे. या आत्मचरित्रातून रानडय़ांचा सरकार दरबारी असलेला अधिकार, त्यांच्यासह केलेले प्रवास, लहान-मोठय़ा सुधारणांविषयक चळवळी यांचीही माहिती मिळते. ‘न्यायमूर्ती’ पदावरच्या आपल्या पतीविषयी वाटणारा अभिमान, त्यांची दिनचर्या, त्यांची आमदनी यांचेही अनेक तपशील येतात. त्यांचे समृद्ध जीवनमान, त्यांचा अधिकार आणि तरीही नम्र आणि सौम्य स्वभाव यांचेही चित्र उमटते.
स्त्रीचे हे पहिले आत्मचरित्र म्हणजे त्या काळचा महत्त्वाचा ऐवज! मुळातून वाचायला हवा, असा!
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)
[email protected]































































