
सामना प्रतिनिधी । मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ नाट्यकर्मी, हौशी रंगभूमीवरील नाटकांचे दिग्दर्शक आणि कोळंब गावचे रहिवासी नारायण वासुदेव तथा बापू कोयंडे (वय- ६६) यांचे रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. मालवणी नटसम्राट मच्छिंन्द्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शन निर्मित वस्त्रहरण या नाटकाच्या प्रारंभीचे 175 प्रयोगात अर्जुन ही भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. रविवारी सकाळी साडे दहा वाजता कोळंब येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोळंब वासीयांबरोबर नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, मित्रमंडळी उपस्थित होती.
कोळंब गावचे रहिवासी असणाऱ्या बापू कोयंडे यांच्या नावाचा जिल्ह्यातील नाट्य क्षेत्रात विशेष असा दबदबा होता. नाट्य कलावंत, दिग्दर्शक, नेपथ्यकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार त्याचप्रमाणे रांगोळीकार, मूर्तीकार अशा विविध क्षेत्रात त्यांचे नाव होते. 30 ऑक्टोबर 1953 रोजी जन्म झालेल्या बापू कोयंडे यांचे कोळंब येथील प्राथमिक शाळेत शिक्षण झाले होते. तर मालवणच्या टोपीवाला हायस्कुलमध्ये मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेतले. बापू कोयंडे यांनी वंशपरंपरागत अशा आपल्या गणेश मूर्ती शाळेत मूर्तिकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षी नाट्य क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या बापू कोयंडे यांनी मालवण तालुक्यातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पौराणिक, प्रायोगिक, सामाजिक आणि व्यावसायिक अशी सुमारे 2 हजारहून अधिक नाटके दिग्दर्शित केली. हौशी रंगभूमीवरील एक अभिजात दिग्दर्शक म्हणून नाव कमावलेल्या बापू कोयंडे यांची संत गोरा कुंभार, भाव तोचि देव, उघडले स्वर्गाचे द्वार, रायगडला जेव्हा जाग येते, रोहीदेश्ववरच राजेश्वर, सह्याद्रीचा सिंह, महाराष्ट्र माऊली, दुरितांचे तिमिर जावो अशी अनेक नाटके गाजली. मालवणी नटसम्राट मच्छिंन्द्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शन निर्मित वस्त्रहरण या नाटकाच्या प्रारंभीचे 175 प्रयोगात अर्जुन ही भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांची ही भूमिका महाराष्ट्रभर गाजली होती . नाट्य क्षेत्रातील त्यांच्या कामगिरी बद्दल मालवणी नटसम्राट मच्छिंन्द्र कांबळी यांच्यासह सुपरस्टार सचिन पिळगावकर, अशोक सराफ, नाना पाटेकर या सारख्या दिग्गज कलावंतांनी त्यांचे कौतुक केले होते.
मालवणातील सिंधुदुर्ग परिमल या संस्थेचे ते सदस्य होते. त्याचप्रमाणे मालवणातील आदित्य थिएटर्स या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. याशिवाय अखिल भारतीय नाट्य परिषद मालवण शाखा, शिवभवानी सांस्कृतिक केंद्र, श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मालवण या संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. बापू कोयंडे यांनी मालवणच्या नाट्य क्षेत्रात नाट्य कलावंतांची एक पिढी घडविली. स्वराध्या फाउंडेशन संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराने बापू कोयंडे यांना गेल्या वर्षी सन्मानित करण्यात आले होते.

































































