दिल्लीत रुग्णसंख्येत कमालीची घट; आजपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. दिल्लीत रविवारी 381 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. 15 मार्चनंतर सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे, तर एका दिवसात 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.5 टक्क्यांच्या खाली आला आहे. 9 मेनंतर रुग्णवाढीची टक्केवारी सर्वात कमी आहे. रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आजपासून दिल्लीत अनलॉकची प्रक्रिया सुरू होत असल्याचे केजरीवाल सरकारने रविवारी जाहीर केले आहे. राजधानीत सम विषम या योजनेनुसार दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सरकारी कार्यालयांत ‘अ’ गटातील कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असेल. तर खासगी कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू करण्याची परवानगी दिली आहे. शहरातील मेट्रो वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहे. या आठवडय़ातील कोरोना रुग्णवाढीच्या दरावर पुढे काय सवलती द्यायच्या याचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.