
मीरा-भाईंदर ते नायगाव मेट्रो प्रकल्प आणि वाहतुकीच्या पुलाचे टेंडर रखडल्याने पाणजू बेटावरील गावकऱ्यांचे कित्येक वर्षांचे पुलाचे स्वप्न भंगले आहे. या गावातून नायगाव किंवा भाईंदर स्टेशन गाठण्यासाठी होडीतून प्रवास करावा लागतो किंवा रेल्वेच्या खाडी पुलावरील ट्रकवरून चालत जीवघेणा प्रवास करावा लागतो. हा प्रवासच आता गावकऱ्यांचे बळी घेऊन लागला आहे. पण तरीही केंद्रापासून राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे.
लोकलमधील एका प्रवाशाने फेकलेला निर्माल्यातील नारळ लागून संजय भोईर या पाणजू बेटावरील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पाणजू बेटावरील रखडलेल्या पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
आतापर्यंत पाच ते सहा मृत्यू
याच गावातील संजय भोईर 25 वर्षांचा तरुण पुलावरून चालत जात असताना ट्रेनमधील प्रवाशाने निर्माल्याची पिशवी खाडीत फेकली. त्यातील नारळ लागून संजयचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रेनमधून निर्माल्याच्या पिशव्यांमध्ये देवाच्या तुटलेल्या फ्रेम, त्याच्या काचा, फुटलेल्या मूर्ती असतात. धावत्या ट्रेनमधून फेकलेल्या फुलांच्या पिशव्याही तोंडावर आदळतात. त्यातून जीवघेणा अपघात होतो. आतापर्यंत अशाच प्रकारच्या अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पाणजू गावाचे माजी सरपंच विलास भोईर यांनी दिली.
गावात जाण्यासाठी पूलच नाही
चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या पाणजू बेटावर सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीच्या या गावात जाण्यासाठी पूलच नाही. गावातील बोटीतल्या लहान होडीतून चार ते पाच मिनिटांचा प्रवास करून नायगाव किंवा भाईंदर स्टेशन गाठावे लागते. मग पुढे ट्रेनचा प्रवास करावा लागतो किंवा रेल्वेच्या पुलावरून ट्रकच्या बाजूने अर्धा तास चालत जीवघेणा प्रवास करीत नायगाव स्टेशन गाठावे लागते. बाजूने धडधडत जाणारी ट्रेन आणि खाली समुद्र अशी दुहेरी कसरत करत स्टेशन गाठावे लागते.
असा होणार होता पूल
मीरा-भाईंदरमधील सुभाषचंद्र बोस मैदान ते नायगाव असा मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि वाहनांसाठी पूल होणार होता. त्याचे टेंडरही निघाले होते. पण पुढे हा प्रकल्प लाल फितीमध्ये अडकला. नायगावकडे जाणारा हा पूल पाणजू गावातून जाणार होता, पण टेंडर रखडल्याने गावकऱ्यांचे पुलाचे स्वप्नही भंगले. आता वर्सोवा ते वसई-विरार पुढे वाढवण बंदर असा कोस्टल रोड होत आहे. पण या पुलामुळे मासेमारीला धोका निर्माण होणार असल्याने पूल आता बाहेरच्या बाजूने जाणार आहे. भाईंदर व नायगाव खाडीवर रेल्वेचा तिसरा पूल होत आहे. पण पाणजूतील गावकऱयांसाठी आतापर्यंत एकाही पुलाची आखणी झालेली नाही, अशी खंत विलास भोईर व्यक्त करतात.