
देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयने आता कर्मचाऱयांसाठी ड्रेसकोड जारी केला आहे. सीबीआयच्या कर्मचारी आणि अधिकाऱयांना आता डय़ुटीवर येताना जीन्स, टी-शर्ट, स्पोर्टस् शूज, चप्पल घालता येणार नाही तसेच दाढीही वाढवता येणार नाही. सीबीआयचे नवे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी हे आदेश दिले आहेत.
सुबोधकुमार जयस्वाल यांची नुकतीच सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली असून त्यांनी सीबीआयच्या विभागीय कार्यपद्धतीत महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. यातील हा पहिला बदल मानला जात आहे. सुबोधकुमार जयस्वाल यांनी मंजुरी दिलेले परिपत्रक सहाय्यक संचालक (प्रशासन विभाग) अनुप मॅथ्यू यांनी जारी केले आहे. यात कर्मचारी, अधिकाऱयांच्या ड्रेसकोडबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. सीबीआयमधील पुरुष कर्मचाऱयांना जीन्स, टी-शर्ट, स्पोर्टस् शूज, चप्पल घालता येणार नाही तसेच दाढीही वाढवता येणार नाही. डय़ुटीवर असताना त्यांना फॉर्मल शर्ट-पॅण्ट आणि फॉर्मल शूज घालावे लागणार आहेत, तर महिला अधिकारी आणि कर्मचाऱयांना डय़ुटीवर येताना केवळ साडी किंवा फॉर्मल शर्ट परिधान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



























































