पाणी पातळी झपाट्याने घटू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फेब्रुवारीतच गंभीर

134

सामना प्रतिनिधी । राहाता

राहाता तालुक्यातील गणेश परीसरातील विहरी व विंधन विहरींची पाणी पातळी झपाट्याने घटू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फेब्रुवारीतच गंभीर बनण्याची शक्यता आहे. प्रशासनाने त्या दृष्टीने वेळीच पावले उचलण्याची गरज असून राहाता शहराला आतापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. राहाता पालिकेच्या साठवण तलावात अवघा २५ टक्केच पाणी साठा शिल्लक राहील्याने गेल्या चार दिवसांपासून पाचव्या दिवशी शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

अल्पशा पावसामुळे राहाता तालुक्यातील पाणी पातळी वाढलीच नाही. त्यात गोदावरी कालव्यांचे पावसाळ्यात ओव्हरफ्लोचे पाणी साठवण तलाव बंधारे व ओढे नाले यात न सोडल्याने गणेश परीसरातील नागरीक व शेतकऱ्यांना जानेवारीतच पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे. विहीरी व विंधन विहरी कोरड्या पडू लागल्याने त्यांच्या भरवंशावर केलेल्या कांदा व गव्हाच्या पिकाला याचा फटका बसण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत पडला आहे. दर वर्षी कसे बसे मार्च महिन्यापर्यंत टिकणारे पाणी फेब्रुवारीत दम तोडण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे. कोऱ्हाळे, काकडी, दहेगांव, खडकेवाके, नपा वाडी, पुणतांबा आदी भागात आतापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. यातील जिराईत भागात शासनाने वेळीच पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा तहान लागल्यावर विहीर खोदायची तयारी प्रशासन करते असा अनुभव नित्याचा आहे.

राहाता शहराचा पाणी प्रश्न जानेवारीतच ऐरणीवर आला असून चार ते पाच दिवसांनी राहाता शहरात नागरीकांना पिण्याचे पाणी सोडले जाते. पालीकेच्या साठवण तलावात अवघा २५ टक्के पाणी साठा शिल्लक राहीला असून जानेवारी अखेरीपर्यंत पाणी कसे बसे टिकेल. त्यानंतर राहातेकरांना पाण्यासाठी टंचाईला सामोरे जावे लागणार. पालिकेच्या साठवण तलावाच्या परीसरातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या विंधन विहीरी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करत असताना पालीका प्रशासन डोळेझाक करत आहे. कालव्याचे आवर्तन बेभरवशाचे झाले असून पालिकेला किमान दोन तिन महीने पाणी पुरेल अशी साठवण क्षमता करण्याची गरज होती. पूर्वी एक साठवण तलाव खोदला. दोन वर्षांपूर्वी टप्पा क्रमांक दोनचे कामही सुरू झाले. त्यासाठी तातडीचा एक कोटींचा निधीही मंजूर आहे. मात्र सत्ता बदल झाल्यावर ते काम बंद पाडण्यात आले, ते अद्यापही बंदच असल्याने शहराला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे नागरीक बोलतात. येणारा काळ हा राहाता शहर व परीसरातील नागरीकांसाठी पाणी टंचाईचा असणार हे मात्र निश्चीत.

आपली प्रतिक्रिया द्या