
मुंबईतील गोरेगाव पूर्वेत पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ ओबेरॉय मॉल येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. स्थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले.
कोविड-19 विषाणू संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका लसीकरण केंद्रांची संख्या वाढवत आहे. याचाच एक भाग म्हणून ड्राईव्ह इन अर्थात वाहनात बसूनच पात्र नागरिकांना लस घेण्याची सोय करण्यात येत आहे. गोरेगांव (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ ओबेरॉय मॉल येथे ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 51 चे नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर यांच्या प्रयत्नांतून हे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोविड संसर्ग प्रतिबंध नियमांचे पालन करुन, कोणताही समारंभ आयोजित न करता मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.































































