लातूर जिल्ह्यातील नागरिकांच्या डोळ्यात पाणी! सर्व नद्या कोरड्याच, तलाव आटलेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

कायम दुष्काळी जिल्हा असा ठसा लातूर जिल्ह्यावर लागला आहे. राज्यातील सर्वच भागातील नद्या, ओढे, तलाव, धरणे भरभरून वाहत आहेत. सगळीकडे पाणीच पाणी झालेले असतानाही लातूरकर मात्र पाण्यासाठी तडफडत आहेत. राज्यातील सर्वच भागातील पाणी पाहता लातूरकरांच्या डोळ्यात मात्र पाणी येत आहे.

लातूर म्हटले की, पाण्याचा भीषण दुष्काळ हे समीकरण मागील कांही वर्षांपासून निर्माण झालेले आहे. रेल्वेने लातूर शहरासाठी पाणी पुरवठा करावा लागला होता. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. अर्धा पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊसच झालेला नाही. पावसाअभावी शेतकऱ्यांना पेरणीही करता आलेली नाही. ज्यांनी पेरणी केलेली आहे त्यांच्या उत्पादनात किती घट येणार हे आगामी काळात दिसून येईल.

यावर्षी लातूर जिल्ह्यात केवळ 29.37 टक्के पाऊस झालेला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 802.13 मि.मी. एवढी आहे. आजपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 235.62 मि.मी. पाऊस झालेला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी लातूर जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी एवढा पाऊस केवळ 2 दिवसात झालेला आहे. सबंध राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. लातूर जिल्हा मात्र कोरडाठाक पडलेला आहे. जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे, गावतलाव अजुनही कोरडेच आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी अनेक ठिकाणी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे.

लातूर तालुक्यात आजपर्यंत 158.59 मि.मी. पाऊस झालेला आहे. औसा तालुक्यात 159.99 मि.मी.पाऊस झाला आहे. रेणापूर तालुक्यात 199 मि.मी. उदगीर तालुक्यात 252.30 मि.मी. अहमदपूर तालुक्यात 306.16 मि.मी. चाकूर तालुक्यात 212.40 मि.मी. जळकोट तालुक्यात 308 मि.मी. निलंगा तालुक्यात 252.59 मि.मी. देवणी तालुक्यात 267.47 मि.मी. तर शिरुर अनंतपाळ तालुक्यात 239.66 मि.मी. पाऊस झालेला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या केवळ 29.37 टक्के पाऊस झाला आहे.

लातूर जिल्ह्यात एकही मोठे धरण नाही. लातूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या आणि उद्योग आणि शेतीसाठीच्या पाण्याची समस्या ही बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर आणि धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पावर अवलंबून आहे. मांजरा प्रकल्पात 642.37 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा होतो. 47.130 दलघमी एवढा मृत पाणीसाठा आहे. आज रोजी या प्रकल्पात मृत साठ्यातील केवळ 6.676 दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न तेरणा प्रकल्पात 604.40 दलघमी पाणीसाठा होतो. 29.967 दलघमी एवढा मृतसाठा आहे. सध्या या प्रकल्पात मृतसाठ्यातील 14.393 दलघमी पाणी उपलब्ध आहे.

लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. रेणापूर तालुक्यातील रेणापूर मध्यम प्रकल्पातही शुन्य टक्के पाणीसाठा आहे. रेणापूर तालुक्यातील व्हटी मध्यम प्रकल्पातही शुन्य टक्के पाणीसाठा आहे. उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्पात 2.520 दलघमी एवढा मृतसाठा उपलब्ध आहे. देवर्जन मध्यम प्रकल्पात 1.731 दलघमी मृतपाणीसाठा उपलब्ध आहे. साकोळ मध्यम प्रकल्पात 1.680 दलघमी मृतसाठा उपलब्ध आहे. घरणी मध्यम प्रकल्पात 1.533 दलघमी मृतसाठा उपलब्ध आहे. मसलगा मध्यम प्रकल्पात 0.043 एवढेच मृतसाठ्यातील पाणी उपलब्ध आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पातील पाणी 0.12 टक्के एवढेच आहे.

लातूर तालुक्यातील गोंदेगाव, वासनगाव, चिकुर्डा, निवळी, कातपूर हे पाच लघूपाटबंधारे प्रकल्प आजही कोरडेच आहेत. औसा तालुक्यात 14 लघूपाटबंधारे प्रकल्प आहेत. त्यामध्ये चिंचोली जो. चिंचोली त., कारला, तुंगी, नणंद, अपचुंदा, सोमदुर्ग, बेलकुंड, सारोळा, माळकोंडजी, वानवडा, येल्लोरी, खुंटेगाव, शिवली यांचा समावेश आहे. हे सर्व 14 लघूपाटबंधारे प्रकल्प कोरडेठाक आहेत. उदगीर तालुक्यातील एकुर्का, पिंपरी, कल्लूर, केसकरवाडी, गुरधाळ, निडेबन, डाऊळ हिप्परगा, गुडसूर, कोदळी, चांदेगाव हे 10 लघू पाटबंधारे प्रकल्प आहेत. एकाही प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा नाही. ाqनलंगा तालुक्यात 11 लघू पाटबंधारे प्रकल्प असून सर्व कोरडेठाक आहेत. अहमदपूर तालुक्यात 27 लघू पाटबंधारे प्रकल्प आहेत मात्र एकही प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा नाही. कांही प्रकल्प पुर्णतः कोरडे आहेत तर कांही जोत्याखाली पाणी असणारे आहेत. अशीच परिस्थीती रेणापूर तालुक्यातील 6 लघूपाटबंधारे प्रकल्पांची सुध्दा आहे. एकाही ठिकाणी उपयुक्त पाणीसाठा नाही.

चाकूर तालुक्यातील 20 लघू पाटबंधारे प्रकल्पापैकी केवळ एका ठिकाणी 0.017 एवढे पाणी आहे. मात्र उपयुक्त पाणीसाठा कुठेच नाही. देवणी तालुक्यात 11 लघू पाटबंधारे प्रकल्पापैकी केवळ एका प्रकल्पात 0.346 दलघमी एवढे पाणी उपलब्ध आहे. उर्वरित सर्व कोरडे किंवा जोत्याखाली पाणी असणारे आहेत. जळकोट तालुक्यातील 10 लघूपाटबंधारे प्रकल्पाची अशीच अवस्था आहे. एकाही प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा नाही. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील एकमेव असणाऱ्या पांढरवाडी लघू पाटबंधारे प्रकल्पात 0.192 दलघमी एवढेच पाणी आहे.

जिल्ह्यातील 18 साठवण तलावापैकी केवळ तीन तलावात नगण्य पाणी आहे. उर्वरित कोरडे किंवा जोत्याखाली पाणीसाठा असणारे आहेत. लातूर जिल्ह्यातील तब्बल 142 प्रकल्पांध्ये आजरोजी केवळ 0.117 दलघमी पाणी उपलब्ध आहे. लातूर जिल्ह्यातील नागरीकांची तहान ही टँकरवरच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. पिण्यासाठी प्रत्येक घरात विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र पडणारा पाऊस, ओसंडून वाहणाNया नद्या, महापूर पाहून लातूरकरांच्या डोळ्यात मात्र पाणी दाटून येत आहे.