हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या निवासस्थानी ड्रोन पडल्याने खळबळ; तपासाअंती झाला धक्कादायक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंदीगडमधील एका उच्च सुरक्षा असलेल्या भागात रविवारी दुपारी अचानक एक ड्रोन पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या निवासस्थानी पडल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडमधील सेक्टर १० मध्ये असलेल्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात एक ड्रोन खाली पडले. अतिसंवेदनशील भागात ही घटना घडल्याने सुरक्षा रक्षकांनी तातडीने याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच चंदीगड पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि सीएफएसएलमच्या (CFSL) टीमला पाचारण करण्यात आले.

सुरुवातीला हा हेरगिरीचा किंवा सुरक्षेतील त्रुटीचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि सखोल चौकशी केली तेव्हा एक वेगळीच माहिती समोर आली. तो ड्रोन शेजारीच राहणाऱ्या एका ९ वर्षांच्या मुलाचा असल्याचे निष्पन्न झाले. तो मुलगा आपल्या घराच्या छतावर खेळत असताना चुकून रिमोट कंट्रोलवरून त्याचे ड्रोनवरचे नियंत्रण सुटले आणि ते ड्रोन उडत जाऊन न्यायमूर्तींच्या निवासस्थानाच्या आवारात पडले.

पोलिसांनी ड्रोनची तांत्रिक तपासणी केली असता त्यात कोणताही संशयास्पद डेटा किंवा कॅमेरा रेकॉर्डिंग आढळले नाही. ही केवळ मुलांच्या खेळातील एक अनवधानाने घडलेली घटना असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची खात्री पटल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कारवाई थांबवली.