ड्रोनच्या मदतीने रोखणार गर्दी, वरळी कोळीवाडय़ात झाले प्रात्यक्षिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील कोळीवाडा, धारावी, भेंडीबाजार आदींसारख्या दाट लोककस्ती असलेल्या तसेच गर्दीच्या भागात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे महत्वाचे आहे. त्यासाठी पोलीस आता आधुनिक ड्रोनची मदत घेणार आहेत. या ड्रोनवरून व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल आणि अनाऊन्सिंगही. आज वरळी कोळीवाडय़ात त्याचे प्रात्यक्षिक गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडले.

या विशेष ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलिस सामाजिक अंतर (सोशल डिस्टेंन्सिंग) लागू करतील असा विश्वास गृहमंत्री देशमुख यांनी व्यक्त केला. या नवीन, मोठय़ा ड्रोनच्या सहाय्याने लोकवस्तींमधे पोलीस सहजतेने व गतीने पोहोचून लक्ष ठेऊ शकतील. या ड्रोन मध्ये असलेल्या उद्घोषणा प्रणालीने (Announcement syste) पोलिस जनतेला सूचना, निर्देशसुध्दा देऊ शकतील. यात व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा असल्याने पोलिसांना मोठी मदत होईल. हिंदुस्थानात सरासरी दर 761 जनसंख्येकरीता एक पोलिस कर्मचारी उपलब्ध आहे. तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये 950 ची सरासरी आहे. साहजिकच पोलीस यंत्रणेवर याचा मोठा ताण पडतो. त्यामुळे अशा आधुनिक तंत्रज्ञानाची निश्चितच मदत होते.